नाशिक – मनुवादी प्रवृत्तींच्या निषेधार्थ बुधवारी नाशिकरोडपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. प्रजासत्ताक दिनी झेंडावदन कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने वन विभागाच्या कर्मचारी मनिषा जाधव यांनी आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर संविधानप्रेमी नाशिककरांनी एकत्र येत बुधवारी मोर्चा काढला.

सकाळी ११ वाजता नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरूवात झाली. प्रजासत्ताक दिनी भाजपचे काही लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी प्रवृत्तीकडून संविधानाचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानाचा अवमान करण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोप आयोजकांनी केला. कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेच्या नावाखाली तपोवन परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असल्याने ही वृक्षतोड थांबवावी, अशी मागणीही मोर्चामार्फत करण्यात आली. मंत्री गिरीश महाजन, धार्मिक तेढ निर्माण करणारे मंत्री नितेश राणे यांना तात्काळ मंत्रिमंडळातून काढावे, ही मागणी यावेळी करण्यात आली.

मोर्चाच्या अग्रस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडर यांचा पुर्णाकृती पुतळा असलेला चित्ररथ होता. मोर्चेकऱ्यांच्या हातात जय भीम, जातीयवाद धोका है, धक्का मारो मोका है, गिरीश महाजन हटाव नाशिक बचाव आदी फलक होते. या मोर्चामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. मोर्चा नाशिकरोडहून द्वारका-शालिमारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी शालीमार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या विषयी बोलतांना राजु देसले यांनी सांगितले, नाशिक शहर तसेच जिल्हात गिरीश महाजन यांच्या विषयी जो आक्रोश होता त्याला २६ जानेवारी रोजी डॉ. आंबेकर यांचा उल्लेख टाळला. माफी नामाच्या सोपस्कारातही ते नाव टाळले गेले याचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. भाजप जातीयवादाला खतपाणी घालत आहे. महाजन यांच्या राजीनाम्यासह तपोवन वृक्षतोड थांबवावी ही ठाम मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.

दरम्यान, मोर्चा सुरळीत पार पडावा यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हे शाखेचे संदिप मिटके, परिमंडळ एक चे उपायुक्त मोनिका राऊत व परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे यांच्यासह तीन सहाय्यक आयुक्त, पोलीस अधिकरारी, अंमलदार यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.