नाशिक : नाशिक ते पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी ठिकठिकाणी जनआंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्ग होणे , ही मागणी काही केवळ एखाद्या शहराची नसल्याने या मार्गासाठी सर्वांनी आंदोलनात उतरण्याची गरज मांडण्यात आली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा या जनआंदोलनासाठी वाढता प्रतिसाद मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये या आंदोलनाबाबत जनजागृती करण्यात येत असून विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने या विषयावर चर्चा करत आहेत.
नाशिक-पुणे या सिन्नर-संगमनेर-राजगुरुनगर सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी कित्येक महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी आता निर्णायक लढा देण्याचे ठरविण्यात आले असून पक्षभेद विसरुन सर्वांनी एकत्रित बळ दाखविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी जनआंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे नसून उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठीचा लोकांचा लढा असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
नाशिकहून पुण्याला जाण्यासाठी सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर हाच सरळ मार्ग योग्य असल्याचे या भागातील लोकप्रतिनिधी, उद्योजक, विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्ग हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नाही, तर उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचा पाया आहे. या प्रकल्पामुळे सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर आणि चाकणसह संपूर्ण परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल. उत्तर महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक आणि व्यापारी शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी दररोज पुणे आणि मुंबईशी जोडलेले आहेत. सरळ रेल्वे मार्गामुळे हा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि किफायतशीर होईल, असा विश्वास सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला आहे.
क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावर विविध ठिकाणी होणाऱ्या जनआंदोलनात नागरिकांनी पक्षीय भूमिका बाजूला ठेवून सहभागी व्हावे, यासाठी ठिकठिकाणी जनजागृतीपर बैठका घेण्यात येत आहेत..पुणे, पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरात शिक्षण, स्पर्धा परीक्षा, इंटर्नशिप आणि नोकरीसाठी नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गाची गरज अधोरेखित केली आहे.
सध्याच्या प्रवासात होणारा वेळेचा आणि आर्थिक खर्चाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याने हा रेल्वे मार्ग भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांनी ९ ऑगस्टच्या जनआंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली असून, हा कोणत्याही पक्षाचा नव्हे तर उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा लढा असल्याची भावना व्यक्त केली आहे. जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्यात येत असून अधिकाधिक युवकांनी या आंदोलनात सहभागी होऊन नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
