नाशिक – नाशिक-पुणे या सिन्नर-संगमनेर-राजगुरुनगर सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी कित्येक महिन्यांपासून होत असलेल्या पाठपुराव्यास आता पक्षभेद विसरुन एकत्रित बळ देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. त्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी जनआंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे नसून उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठीचा लोकांचा लढा असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले. या जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

नाशिकहून पुण्याला जाण्यासाठी सध्या महामार्गाची व्यवस्था असली तरी महामार्गाने पुणे गाठण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. त्यातच काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरु असल्याने या वेळेत बऱ्याचवेळा अधिक वाढ होते. नाशिक-पुणे-मुंबई हा सुवर्ण त्रिकोण मानला जातो. नाशिक-मुंबई रेल्वेसेवा असली तरी नाशिक-पुणे रेल्वेमार्गाची कित्येक वर्षांपासून होत असलेली मागणी प्रलंबित आहे. या मागणीला अचानक चालना मिळून भूसंपादनासाठी हालचालीही सुरु झाल्या होत्या. सर्वेक्षणही करण्यात आले होते.

परंतु, नंतर नाशिकहून सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर या सरळ मार्गाऐवजी नाशिक-पुणे रेल्वे कोपरगाव, शिर्डीमार्गे नेण्याचा निर्णय झाला. या निर्णयास नाशिकसह संगमनेर, राजगुरुनगर येथून प्रचंड विरोध होत आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, खासदार अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक-पुणे नवीन रेल्वेमार्गास प्रखर विरोध केला आहे. सध्या नवीन रेल्वेमार्गाचा विषयही बासनात गेला असताना नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेर, राजगुरुनगरमार्गेच होण्यासाठी पुन्हा सर्वजण एकवटू लागले आहेत.

शिर्डीमार्गे रेल्वेला विरोधाचे कारण

नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्ग हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नाही, तर उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचा पाया आहे. या प्रकल्पामुळे सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर आणि चाकणसह संपूर्ण परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल. उत्तर महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक आणि व्यापारी शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी दररोज पुणे आणि मुंबईशी जोडलेले आहेत. मात्र, अपुऱ्या सुविधांमुळे त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाया जात आहेत.

सरळ रेल्वे मार्गामुळे हा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि किफायतशीर होईल, असा विश्वास सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला आहे. “नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठीचा संघर्ष केवळ रेल्वेसाठी नसून उत्तर महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे,” असे आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले.
क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावर विविध ठिकाणी होणाऱ्या जनआंदोलनात नागरिकांनी पक्षीय भूमिका बाजूला ठेवून सामान्य नागरिक म्हणून सहभागी व्हावे आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी एकजुटीने आवाज उठवावा, असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे.