नाशिक – नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी क्रांतीदिनी ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्गावर एकाचवेळी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. वळणाच्या मार्गाने रेल्वेचे ७० किलोमीटरचे अंतर वाढणार असून त्याचा फटका सर्व घटकांना बसणार आहे. त्यामुळे नाशिक-शिर्डी-पुणतांबा-अहिल्यानगर-पुणे हा वळणाचा रेल्वे मार्ग प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीची बैठक बुधवारी झाली. यावेळी उदय सांगळे, हरिभाऊ तांबे, प्रा. राजाराम मुंगसे, दत्ता वायचळे, जयराम गीते, कृष्णा पोटे, राजाराम मुरकुटे आदी उपस्थित होते. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सूचनेनुसार नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध गावांतील पदाधिकाऱ्यांनी वॉर्डनिहाय आणि गटनिहाय बैठका सुरू केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. भाजप नेते उदय सांगळे यांनीही बैठका घेऊन रेल्वे मार्गाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण सिन्नर तालुक्यात जनजागृती मोहीम वेगाने सुरू असून कृती समितीही गावनिहाय बैठका घेऊन नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहे.
कृती समितीचे सदस्य बबन वाजे यांनी हा लढा कोणत्याही पक्षाचा नसून उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा, भावी पिढ्यांच्या भविष्याचा आणि लाखो नागरिकांच्या न्याय्य हक्काचा असल्याचे नमूद केले. नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग गेल्या ४० वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी सिन्नर तालुक्यासह इतरत्र भूसंपादनाची प्रक्रियाही करण्यात आली. सर्वेक्षण, आराखडे आणि भूसंपादनावर शासनाने कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च केला. आता हा प्रकल्प बाजूला ठेवून जनतेकडून मागणी नसलेला नाशिक–शिर्डी–पुणतांबा–अहिल्यानगर–पुणे हा नवीन रेल्वे मार्ग पुढे रेटण्यात येत असल्याने आतापर्यंत झालेला सर्व खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे, याकडे समितीने लक्ष वेधले.
राजकीय समीकरणांचा फटका
अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे, श्रेयवाद आणि अंतर्गत राजकारणाचा फटका नाशिक-पुणे सरळ रेल्वे प्रकल्पाला बसला आहे. वळणाच्या मार्गामुळे रेल्वेचे अंतर सुमारे ६० ते ७० किलोमीटरने वाढणार असून प्रवासाचा वेळ, इंधन खर्च आणि संचालन खर्च वाढणार आहे. अनेक घटकांचे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी आणि उद्योजकांचे आर्थिक नुकसान होईल. सिन्नर एमआयडीसी, संगमनेर औद्योगिक क्षेत्र, कृषी प्रक्रिया उद्योग, द्राक्ष व वाइन उद्योग, कृषी निर्यात तसेच पुणे–नाशिक औद्योगिक कॉरिडॉरच्या विकासालाही फटका बसणार आहे. त्यामुळे वळणाचा मार्ग रद्द करून नाशिक-सिन्नर-संगमनेर-अकोले-नारायणगाव-आळेफाटा-मंचर-खेड-चाकण-पुणे या सरळ सेमी हायस्पीड रेल्वे मार्गास तात्काळ मंजुरी द्यावी, रेल्वे मंत्रालयाने लोकप्रतिनिधी, उद्योग संघटना, रेल्वे तज्ज्ञ आणि रेल्वे कृती समिती यांची बैठक बोलवावी, अशी मागणी रेल्वे कृती समितीने केली.
