नाशिक – नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गासाठी आपला संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा संघर्ष सुरु असतानाच नाशिकहून सिन्नरला जाणाऱ्या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्याची बातमी काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. त्यामुळे नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग सरळ न होता शिर्डी-अहिल्यानगरमार्गेच जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, त्यामुळे लगेच घाबरून जाण्याची किंवा गडबड करण्याची गरज नाही, असे मत आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडले आहे.

नाशिक-पुणे मूळमार्गाने म्हणजे नाशिक-सिन्नर-संगमनेरमार्गे पुढे पुण्यापर्यंत करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत राज्य शासनाने ६ ऑगस्ट रोजी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीला ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या समितीच्या कामकाजाकडे पाहणे आणि त्यानंतर योग्य वेळी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले.

आज आलेल्या बातमीने आपण अतिशय घाबरून किंवा गडबडून जाण्याची गरज नाही. आपण थोडे दिवस धीर धरला पाहिजे. साठ दिवसांचा जो कालावधी आहे, त्यातील साधारण ३० ते ३५ दिवस झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा करूया. जनसुनावणी का होत नाहीये, समितीच्या कामकाजाबाबत काय स्थिती आहे आणि मुदतवाढ तर दिली जाणार नाही ना, याबाबतीत राज्य शासनाकडे पाठपुरावा करूया, असे आमदार तांबे म्हणाले. समितीचा अहवाल आल्यानंतर आंदोलन करण्याची भूमिका घेण्यापेक्षा अहवाल येण्यापूर्वीच आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काही लोक असे म्हणतात की, साठ दिवसांचा रिपोर्ट येऊ द्या, मग आम्ही आंदोलन करू. पण जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या डॉ. अनिल काकोडकरांसारख्या शास्त्रज्ञांनी एकदा रिपोर्ट दिल्यानंतर त्या रिपोर्टमध्ये बदल करण्याइतके आपण कोणी मोठे नाही. त्यामुळे जे काही प्रयत्न आपल्याला करायचे असतील, ते रिपोर्ट येण्याच्या आधीच आपल्याला करावे लागणार आहेत,” असे तांबे यांनी सांगितले. काकोडकर समितीचा अहवाल केवळ तांत्रिक मुद्द्यांपुरता मर्यादित न राहता, या रेल्वे मार्गाशी संबंधित जनतेच्या भावना आणि अपेक्षांचाही विचार करून तयार व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे तांबे यांनी नमूद केले.

आपला हा लढा सुरूच राहणार आहे. त्यामुळे आजची बातमी आलेली आहे म्हणून घाबरून न जाता डॉ. अनिल काकोडकर समितीचा रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टसाठी जनसुनावणी कशी होईल आणि तांत्रिक मुद्द्यांवर फक्त रिपोर्ट न बनता जनतेच्या भावना देखील तो रिपोर्ट बनवताना कशा सामावून घेतल्या जातील, या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे.