नाशिक – नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी आता जनआंदोलन उभारण्याची वेळ आली आहे, असे आवाहन आ. सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत केले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू असून सकारात्मक कार्यवाही न झाल्यास नऊ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा तांबे यांनी दिला.

नाशिक–पुणे दरम्यान थेट रेल्वेमार्गाची गरज अनेक वर्षांपासून अधोरेखित होत आहे. अवघ्या १५० किलोमीटरच्या अंतरासाठी नागरिकांना मोठा वळसा घालावा लागतो. अनेकदा रस्ते वाहतुकीवरील ताणामुळे पुणे गाठण्यासाठी सात तास लागतात. कुठल्याही राजकीय श्रेयवादाच्या लढाईपेक्षा नागरिकांचे हित महत्वाचे आहे. मूळ अपेक्षित मार्गाऐवजी शिर्डीमार्गे नियोजन करण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शिर्डीमार्गे रेल्वे वळविण्यात राजकीय वास येत असल्याची टीका आमदार तांबे यांनी केली. लोकप्रतिनिधींबरोबर आता सर्वसामान्य नागरिकांनी संघटितपणे दबाव निर्माण करण्याची गरज आहे. नाशिक–पुणे रेल्वेसाठी लोकशक्ती उभी राहिल्यास शासनाला निर्णय घ्यावाच लागेल. विविध ठिकाणी रस्ता रोकोसह वेगवेगळ्या स्वरूपातील आंदोलने करण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.

समृद्धी महामार्गाचे जोड रस्ते रखडल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. समृद्धी महामार्गाचा नाशिककरांना अपेक्षित फायदा झालेला नाही. नाशिक ते साकूर फाटा या जोडरस्त्यासाठी अद्याप निविदा निघालेली नाही. हे काम लवकरात लवकर सुरू झाले पाहिजे. तसेच घोटी आणि इगतपुरी असे दोन्ही टोल भरावे लागत असल्याने नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. नाशिक शहर मुंबई आणि पुण्याच्या जवळ असूनही अपेक्षित विकास झालेला नाही, अशी खंत तांबे यांनी व्यक्त केली. नाशिक – पुणे रेल्वे मार्गाचा नाशिकला थेट फायदा होणार असल्याने प्रत्येक नाशिककराने नऊ ऑगस्ट या क्रांतिदिनी होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन नाशिक–पुणे रेल्वे मार्गासाठी जनदबाव निर्माण करावा, असे आवाहन तांबे यांनी केले.

समृद्धी महामार्गाचा नाशिककरांना नेमका फायदा कधी?

नाशिक–समृद्धी जोड रस्त्यासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण झाले असून निधीही मंजूर आहे, मात्र नाशिक ते साकूर फाटा या जोड रस्त्याचे टेंडर अद्यापही निघालेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत आहे. या विलंबाचा फटका नाशिककरांना बसत आहे. समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी नागरिकांना आधी मुंबई–आग्रा महामार्गाचा टोल आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाचा टोल भरावा लागतो. एका प्रवासासाठी दोन टोल भरावे लागत असल्याने नागरिकांवर दुहेरी आर्थिक भार पडत आहे. तसेच भरवीर टोलनाक्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा वेळ खर्च होतो. आणि वाहतूक कोंडीलाही तोंड द्यावे लागते, असे आमदार तांबे यांनी नमूद केले.