नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे मार्गाबाबत सध्या नाहक संभ्रम निर्माण झाला आहे. नाशिक–शिर्डीमार्गे नाशिक–पुणे रेल्वेचा अंतिम मार्ग निश्चित झाला असून संपूर्ण प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची चर्चा वस्तुस्थितीला धरून नाही. नाशिक–पुणे रेल्वेबाबत संभ्रम नको. अंतिम मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही, असे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक–पुणे रेल्वेसाठी सुरुवातीला नाशिक – सिन्नर– संगमनेर– नारायणगाव – चाकण–पुणे असा थेट मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, नारायणगावजवळील खोडद येथील जीएमआरटी वेधशाळेच्या वैज्ञानिक कार्यावर संभाव्य परिणामाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर या मार्गाबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यानंतर पर्यायी मार्गांचा विचार सुरू झाला.

या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. समिती विविध पर्यायांचा तांत्रिक व शास्त्रीय अभ्यास करून अहवाल देणार आहे. हा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसताना कोणताही मार्ग अंतिम झाल्याचे सांगणे योग्य नाही, असे खासदार वाजे यांनी सांगितले. काकोडकर समितीच्या अहवालानंतरच या संदर्भात निर्णय होईल. नाशिक–शिर्डीचा सुमारे ९५ किमी मार्ग आणि अहिल्यानगर–पुण्याचा सुमारे १३३ किमी मार्ग हे स्वतंत्र टप्पे आहेत. या मार्गांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) किंवा भूसंपादन प्रक्रिया पुढे गेली असली, तरी त्यावरून संपूर्ण नाशिक–पुणे रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरी मिळाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही.

जीएमआरटीसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या वैज्ञानिक प्रकल्पाचे संरक्षण झालेच पाहिजे. त्याचवेळी जीएमआरटीचे कार्य अबाधित ठेवून नाशिक–पुणे रेल्वेचा थेट मार्ग शक्य आहे का, याचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. बोगदा, उन्नत मार्ग, संरेखनातील बदल यांसह सर्व तांत्रिक पर्याय तपासून व्यवहार्य मार्ग निश्चित करावा, अशी नाशिककरांची आग्रही मागणी आहे. नाशिक–पुणे रेल्वे ही नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या उद्योग, शेती, रोजगार, शिक्षण आणि पर्यटन विकासासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे काकोडकर समितीचा अहवाल आल्यानंतर तांत्रिक व्यवहार्यता आणि व्यापक जनहित लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घ्यावा, असे खासदार वाजे यांनी स्पष्ट केले.

तांत्रिक पर्यायांचा विचार आवश्यक

जीएमआरटीचे संरक्षण आणि नाशिक–पुणे रेल्वे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे घाईघाईने कोणताही मार्ग अंतिम न करता काकोडकर समितीचा अहवाल आणि सर्व तांत्रिक पर्यायांचा विचार करून जनहिताचा निर्णय घेतला पाहिजे, याकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी लक्ष वेधले आहे.

काकोडकर समितीच्या अहवालाची प्रतीक्षा

नाशिक–पुणे रेल्वे हा नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. काकोडकर समितीचा अहवाल येण्यापूर्वी कोणताही मार्ग अंतिम झाल्याचे सांगणे योग्य नाही, असे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी म्हटले आहे.