​नाशिक: नाशिक-पुणे रेल्वेच्या मूळ आरेखनामुळे नारायणगाव येथील आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षण अर्थात ‘जीएमआरटी’ (जीएमआरटी) प्रकल्पाच्या अँँटेनाला व्यत्यय येत असल्याने या रेल्वे मार्गाच्या मर्यादित बदलासाठी विशेष तज्ज्ञांची समिती नेमून या प्रकरणी सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शासनाकडून स्थापन केली जाणारी ही समिती तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे. दुसरीकडे नाशिक-पुणे जलदगती रेल्वेमार्ग मूळ मार्गानेच नेण्यात यावा, यासाठी सिन्नर रेल्वे कृती समितीने हाती घेतलेली पत्र मोहीम २० ते २५ हजार पत्रे पाठविण्यापर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

​नाशिक-पुणे रेल्वे मार्गासंदर्भात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. ३२ देशांचा सहभाग असणाऱ्या आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षण प्रकल्पाच्या नियमावलीत बदल करणे शक्य नसल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. या मार्गाच्या पर्यायी आखणीबाबत व्यवहार्यता आणि तांत्रिक बाबी यांचा सखोल अभ्यास ही समिती करेल. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढला जाईल. या मार्गाची पर्यायी आखणी करून पूर्वी सुटलेली गावे या रेल्वे मार्गास जोडली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयाचे नाशिक–पुणे जलदगती रेल्वे मार्गाच्या मूळ मार्गावरील गावांमध्ये स्वागत होत आहे.

​नाशिक–पुणे जलदगती रेल्वे मार्गासाठी नाशिक-सिन्नर– अकोले– संगमनेर– नारायणगाव – राजगुरुनगर – चाकण असे मूळ संरेखन होते. रेल्वे मंत्रालयाने त्यात बदल केल्यापासून मूळ मार्गावरील गावांमध्ये अनेक आंदोलने झाली. या लढ्याला जनआंदोलनाचे रूप देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी युवक व विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आपली भावना कळवण्याचे आवाहन केले होते. संगमनेर व अकोले तालुक्यातून सुरू झालेली ही पत्र मोहीम नंतर सिन्नर तालुक्यातही सिन्नर तालुका कृती समितीकडून राबविली जात आहे.

​या मोहिमेंतर्गत सिन्नर तालुक्यातून २० ते २५ हजार पत्रे पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शासन तज्ज्ञांची समिती गठित करणार असला तरी, पत्र मोहीम दबाव गट म्हणून काम करेल, असे कृती समितीचे पदाधिकारी बबन वाजे यांनी सांगितले. सिन्नर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पत्रे पाठविली जातील. केवळ विद्यार्थीच नव्हे, तर उद्योजकांच्या संघटना आणि शाळांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. यासाठी सिन्नर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (सिमा) एक हजार पत्रे खरेदी केल्याचे वाजे यांनी नमूद केले. २५ हजार पत्रे पूर्ण होईपर्यंत कृती समिती ही मोहीम सुरूच ठेवणार आहे.