नाशिक : शहरात सध्या कुंभमेळ्याच्या हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांना वेग आला असून, या माध्यमातून नाशिकचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या खोदकामांमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल पुन्हा दिलगिरी व्यक्त करत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी, या कामांमुळे काही काळ त्रास सहन करावा लागेल; मात्र पुढील वर्षी देशभरातील लोक नाशिक पाहण्यासाठी येतील, असे सांगितले.

मुसळधार पावसानंतर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके, महापालिका आयुक्त मनिषा खत्री आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. रामकुंड, जुने नाशिक, ऐतिहासिक वाडे, होळकर पूल, वाघाडी नदी परिसर, गंगा घाट तसेच सराफ बाजार परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पावसामुळे जुन्या वास्तूंवर निर्माण झालेला ताण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. धोकादायक इमारतींवर सातत्याने लक्ष ठेवून गरज भासल्यास तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाजन म्हणाले, रात्री २ ते सकाळी ९ या सात तासांच्या कालावधीत तब्बल १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान खात्याचा कमी पावसाचा अंदाज असल्याने सकाळी शाळा आणि महाविद्यालये सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला ती तत्काळ बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. गोदावरी नदीला आलेला पूर हा केवळ पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे असून, गंगापूर धरणातून अद्याप विसर्ग करण्यात आलेला नाही. गंगापूर धरणात सध्या ६५ टक्के जलसाठा असून, तो ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर विसर्ग सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या मुसळधार पावसामुळे कुठे पाणी साचले, कुठे अडचणी निर्माण झाल्या, याची एकप्रकारे रंगीत तालीमच झाली, असेही त्यांनी नमूद केले. त्र्यंबकेश्वर येथील साधुग्रामासाठी नियोजित जागेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ती जागा बदलण्याचा किंवा तेथे सुमारे पाच फूट भराव टाकण्याचा विचार होत आहे. नागरिकांनी पुढील दोन-तीन दिवस विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच नदीचा पूर किंवा धबधबे पाहण्यासाठी गर्दी करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पावसाळी गटार योजनेची चौकशी होणार

नाशिक शहरात काही वर्षांपूर्वी सुमारे ४०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पावसाळी गटार योजनेची परिणामकारकता बुधवारच्या मुसळधार पावसात दिसून आली नाही. या प्रश्नाची सखोल चौकशी केली जाईल, असे महाजन यांनी सांगितले.

अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना १ कोटी

अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या सहा ते सात प्रभावित जिल्ह्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीचा वापर नागरिकांचे स्थलांतर, अन्नव्यवस्था, तात्पुरता निवारा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी करण्यात येणार आहे.