नाशिक – हवामान विभागाने वर्तविलेल्या मंगळवारी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ढगफुटीचा अंदाज वर्तविला होता. मंगळवारी नाशिक तालुक्यात ढगफुटी झाली नसली तरी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. परंतु, बुधवारी पहाटे दोन वाजेपासून नाशिक शहर परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे पहाटे सात वाजेच्या दरम्यान नाशिक येथे गोदावरीच्या पाणी पातळीचे मापक ठरलेल्या ‘दुतोंड्या मारुती’ च्या गुडघ्यांपर्यंत पाणी आले होते. गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आलेला नसला तरी आजूबाजूच्या नाल्यांचे पाणी गोदावरीत येत असल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.
नाशिक जिल्ह्यात इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर येथेही जोरदार पाऊस सुरु आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय पालखेड धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे धरणातील पाणी साठ्यातील होणारी झपाट्याने वाढ तसेच पावसामुळे येणारा येवा बघता जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन पालखेड धरणातून कादवा नदीमध्ये बुधवारी सकाळी ९.०० वाजता ६२० क्युसेकने विसर्ग प्रवाहित करण्यात येणार आहे. तसेच पुढील कालावधीत धरणामधील आवक बघून टप्याटप्याने विसर्ग वाढवावा लागणार आहे. त्यामुळे कादवा नदीकाठच्या नागरिकांनी नदीप्रवाहात कोणीही जावू नये तसेच नदीकाठलगतची पशु-धन, चीजवस्तु, शेती मोटारपंप सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी, अशी सूचना पालखेड पाटबंधारे उपविभागाच्या सहायक कार्यकारी अभियंत्यांकडून देण्यात आली.
सोमवारी आणि मंगळवारी नाशिक तालुक्यात पावसाचा जोर कमी होता. परंतु इगतपुरी तालुक्यात सोमवारी रात्रीपासून तालुक्यात पावसाने जोरदार सुरुवात केली. रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत म्हणजेच २४ तासात तब्बल २०० मिलीमीटरची (द्विशतक) नोंद झाली. इगतपुरी तालुक्यात मंगळवारपर्यंत एकूण ७२९ मिमी पाऊस झाला. गेल्या वर्षी दोन जुलै रोजी तालुक्यात २४० मिमी असा विक्रमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदाचा आकडा थोडा कमी असल्याने २४ तासातील पावसाचा तो विक्रम अद्याप अबाधित राहिला. इगतपुरी तालुक्यातील नद्या कोरड्याठणक पडल्या होत्या. मात्र, कोसळधारेमुळे नद्यांना पूर आला आहे. दारणा, वाकी, भाम आणि भाम या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. इगतपुरी तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी भर घातली आहे: भावली आणि भाम धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने मोठी वाढ होत आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
