नाशिक – प्रदीर्घ काळापासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिकमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. पहिल्याच पावसात शहरात दाणादाण उडाली. कुंभमेळ्यासाठी खोदलेल्या रस्त्यांवर चिखल, मातीसह पाणी आल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. वाहनधारकांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. विविध भागात झाडे आणि फांद्या पडल्या. अनेक भागात दुपारपासून खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत पूर्ववत झाला नव्हता. पंचवटीतील कपालेश्वर मंदिर परिसरात वाड्याची भिंत, पत्रे कोसळल्याने एक भाविक जखमी झाला. जुने नाशिकमध्ये वाड्याची भिंत कोसळली. वीज पुरवठा खंडित झाल्याची झळ अनेक भागातील पाणी पुरवठ्याला बसली.
उन्हाच्या तडाख्याने भाजून निघालेल्या नाशिकमध्ये मंगळवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. कुंभमेळ्यानिमित्त हाती घेतलेली रस्त्याची कामे आणि विविध कारणांस्तव झालेले खोदकाम यामुळे शहराची आधीच बिकट अवस्था झाली आहे. खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती, समतलीकरण वेळेत न झाल्याचा फटका नागरिकांना बसला. पावसात रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले. खोदकामाने काही ठिकाणी पाणी तुंबले. चिखल व माती रस्त्यावर आल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. खोदकाम, एकेरी मार्गामुळे वाहतुकीचा आधीच बोजवारा उडालेला आहे. पावसाने त्यात आणखी भर पडली. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागले.
वादळी वारा व पावसात पंचवटीतील कपालेश्वर मंदिरालगतच्या वाड्याच्या काही विटा कोसळून पत्रे उडाले. हा पत्रा डोक्यात पडून एक भाविक जखमी झाल्याचे सांगितले जाते. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार वेगवेगळ्या भागात सुमारे १७ झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. यात दोन मोटारींचे नुकसान झाले. जुने नाशिक भागात वाड्याची भिंत कोसळली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे दलाकडून सांगण्यात आले.
कित्येक तास वीज पुरवठा खंडित
पहिल्याच पावसात महावितरणची वीज पुरवठा व्यवस्था कोलमडली. पावसाळ्याआधी मोठ्या प्रमाणात देखभाल, दुरुस्तीची कामे केल्याचा दावा केला गेला होता. परंतु, काही ठिकाणी फारसा पाऊस नसताना वीज पुरवठा खंडित झाला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत पंचवटीतील अमृतधाम, लक्ष्मीनगर, बळी मंदिर परिसर, धात्रक फाटा या संपूर्ण भागात दुपारपासून गायब झालेली वीज सायंकाळी उशिरा एकेका भागात परतली. या भागाला वीज पुरवठा करणारे उपकेंद्रच बंद पडल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. शहरातील निम्म्याहून अधिक भागात वीज पुरवठा ठप्प झाला होता. रात्री हळूहळू वीज पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.
पाणी पुरवठाही विस्कळीत
नाशिक महानगरपालिकेच्या गंगापूर जॅकवेल पंपिंग स्टेशन येथून नाशिक शहरास होणारा पाणीपुरवठा सायंकाळपासून बंद झालेला आहे. गंगापुर पंपिंग स्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जॅकवेल पंपिंग बंद झाले. परिणामी, शहरातील सहा जलशुद्धीकरण केंद्रांना होणारा पाणी पुरवठा बाधित झाला असून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या जॅकवेल पंपिंग स्टेशनसाठी सातपूर व महिंद्रा असे दोन वीज फीडर उपलब्ध आहेत. त्यापैकी महिंद्रा फीडरवरीव कंडक्टर तुटल्याने वीज पुरवठा खंडित झालेला आहे. तसेच सातपूरचा सहाय्यक फीडर देखील बंद असून, त्या वाहिनीवर झाड पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे.
वादळी पावसात या घटना घडल्या असून महावितरणकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर जॅकवेल पंपिंग तात्काळ सुरू करण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. तथापि, पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो, असे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे.
