नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक परिसरात मंगळवारी रात्रीपासून ढगफुटीसदृश पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने शहरासह पाच तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये आणि आठवडे बाजारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तश्रृंगी देवीचे मंदिरही बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-आग्रा महामार्ग वाहतुकीसाठी खुले राहणार असून, समृद्धी महामार्गावर वाहनचालकांना वेगमर्यादेचे पालन करावे लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीची शक्यता व्यक्त केली असून, काही भागांत ३०० मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. पुढील २४ तास नाशिक जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, या भागात तीव्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने अतिवृष्टीची शक्यता वाढल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क केल्या असून परिस्थितीवर करडी नजर ठेवली आहे.

सुरक्षेच्या उपाययोजनेचा भाग म्हणून बाधित होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्रांतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी केले. धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून चार विशेष वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. 

अतिवृष्टीमुळे लहान बंधारे धोकादायक ठरू नयेत म्हणून त्यांचे दरवाजे उघडले जात आहेत. नदीकाठावरील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर सुरू आहे. इगतपुरीमार्गे मुंबईला जोडणाऱ्या मध्य रेल्वे मार्गाबाबतही रेल्वे प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली असून त्र्यंबकेश्वर मंदिर ९ जुलैपर्यंत, तर सप्तश्रृंगी देवीचे मंदिर मंगळवारी बंद राहणार आहे.

समृद्धी महामार्गावर खबरदारी… 

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोणताही मुख्य रस्ता किंवा महामार्ग बंद केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग अंदाजे ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत मर्यादीत ठेवण्यात येणार असून, त्यासाठी महामार्गावर वेगमर्यादेचे फलक लावले जाणार आहेत. महामार्ग पोलीस व संबंधित विभाग याबाबत नियोजन करतील, असे प्रशासनाने म्हटले आहे. दरडी कोसळण्याचा किंवा पूल पाण्याखाली जाण्याचा धोका असलेल्या काही अंतर्गत रस्त्यांवरच तात्पुरती खबरदारी घेतली जाणार आहे.