नाशिक – भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक ग्रामीणसह पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यांना ढगफुटीसदृश पावसाचा इशारा दिला होता. परंतु, मंगळवारी सकाळपासून ढगफुटीला पूरक ढग तसेच भोवरा पालघर, अहिल्यानगर, सुरतकडे सरकल्याने नाशिक जिल्ह्यावरील नैसर्गिक संकट दूर झाले असले तरी संततधार सुरु असल्याने अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्हा प्रशासन मंगळवारी सकाळपासून रस्त्यावर उतरल्याचे दिसले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी इगतपुरी तालुक्यातील गावांना भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. दुसरीकडे, सहायक जिल्हाधिकारी तथा नाशिकच्या उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे यांनी सकाळी गंगापूर धरण, कश्यपी धरणासह गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा परिसरास भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळीच इगतपुरी तालुका गाठला. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्र्यंबकेश्वर ते खोडाळा दरम्यानचा रस्ता पावसामुळे बंद झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील जुना कसारा महामार्गावर एका ठिकाणी माती आल्याने वाहनधारकांना वाहने सावकाश चालविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

नाशिक जिल्हाधिकारी प्रसाद यांनी इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो ते पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या भावली या दरम्यानच्या दारणा नदीवरील पुलाची पाहणी केली. याठिकाणी नदीची पाणीपातळी वाढत असून सततच्या पावसामुळे पुलावरुन पाणी वाहण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी याठिकाणी बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना दिल्या. तसेच आवश्यकता भासल्यास पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी त्यांचेसमवेत इगतपुरी-त्र्यंबकेश्ववरचे प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. जी. व्ही. एस. पवनदत्ता उपस्थित होते. त्यांनी तहसीलदार अभिजित बारावकर यांच्याशी संवाद साधत इगतपुरी तालुक्यातील परिस्थितीची माहिती घेतली.

सहायक जिल्हाधिकारी तथा नाशिकच्या उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे यांनीही सकाळी गंगापूर धरण, कश्यपी धरणासह गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा परिसरास भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. ठुबे यांनी सोमेश्वर धबधबा, गंगापूर धरण, कश्यपी धरण, जलालपूर, महादेवपूर घाट आदी परिसरास भेट दिली.सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी तहसीलदार पंकज पवार उपस्थित होते. ठुबे यांनी सांगितले की, सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे पर्यटक, नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये. घाट, धबधबे आदी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तलाठी, मंडळ अधिकारी यांना परिस्थितीवर लक्ष ठेवून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही स्वसुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन अर्पिता ठुबे यांनी केले.