नाशिक – मंगळवारी दिवसभर मध्यम असलेल्या पावसाने रात्रीपासुन शहर परिसरात मुसळधार स्वरुप धारण केले. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते पाण्याखाली आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. याचा फटका बुधवारी विद्यार्थ्यांना बसला. बुधवारी दिवसभर पाऊस सुरू राहिल्याने सकाळ सत्रातील शाळा मधल्या सुट्टीनंतर सोडून देण्यात आल्या. तर दुपार सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. शिक्षण विभागाच्या या ढिसाळ नियोजनाचा फटका विद्यार्थी, पालकांना बसला.
मंगळवारी रात्री पावसाचा जोर कायम होता. शहरात ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचले. बुधवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने सकाळ सत्रातील शाळा गाठण्यासाठी पालक, विद्यार्थी तसेच विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. शिक्षकांनाही शाळेत वेळेत पोहचण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घेताना अडचणी आल्या. शाळेबाहेरील प्रवेशव्दारासमोरच पालक , विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने उभी करण्यात आल्याने शिक्षक तसेच पालकांना शाळेच्या आवारात येण्यासाठी अडचणी आल्या.
याविषयी वैशाली बिडकर यांनी आपले म्हणणे मांडले. रात्रभर पाऊस सुरू होता. बुधवारी सकाळी उठल्यावर व्हाॅटसॲपवरील शाळेचा ग्रुप पाहिला. त्यावर कुठलाही संदेश नव्हता. त्यामुळे सकाळी मुलीला शाळेत वेळेवर पोहचविण्यासाठी तयारी केली. मुसळधार पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणी होते. पावसामुळे समोरचे काहीही दिसत नव्हते. दोन ते तीन वेळा गाडी खड्ड्यात गेली. काही ठिकाणी गाडी बंद पडली. खड्डे आणि पावसाचे पाणी या संकटांना तोंड देत शाळेत गेल्यावर अनेक विद्यार्थी आलेलेच नसल्याचे समजले. साडेनऊला शाळा मधल्या सुट्टीनंतर सोडण्यात येणार असल्याचा संदेश आला. त्यामुळे एवढा आटापिटा आपण का केला, हा प्रश्न पडला, असे त्यांनी सांगितले. अश्विनी पंत यांनी, शाळेकडून कुठलीच माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. शाळा घरापासून जवळ असल्याने दुचाकीने मुलाला सोडले. पण रस्त्यावर पाणी आणि शाळेच्या आवारात गुडघ्याइतके पाणी असल्याने जवळच असलेली शाळा गाठण्यासाठी अर्धा तास लागला. रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन चालक सुहास वैद्य यांनीही आपली अडचण मांडली. शाळेकडून कुठलीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे सकाळी सहा वाजेपासूनच विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी घेण्यास सुरुवात केली. जोरदार पाऊस, रस्त्यावर माती, गाळ यामुळे गाडी मधेच रुतत होती. चिखल, माती आणि पाण्यामुळे गाडी आतून-बाहेरुन खराब झाली. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने काही ठिकाणी गाडी खड्ड्यांमध्ये जोरात आदळत होती. त्यामुळे मुलांनाही त्रास झाला. काहींचे खाण्याचे डबे पडले, असे त्यांनी सांगितले.
महापालिका शिक्षणाधिकारी मीता चौधरी यांनी आपली भूमिका मांडली. मंगळवारी शहरात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे शाळेला सुट्टी दिली होती. रात्री उशीरा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता शहरात धोकादायक परिस्थिती नाही, असे समजले. परंतु, मंगळवारी रात्री उशीरा पाऊस सुरू झाला. बुधवारी सकाळीही पाऊस कायम राहिला. पावसाचा वाढता जोर पाहता महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. सकाळ सत्रात शाळा कमी असतात. दुपारी शाळा भरण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे दुपारच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. सकाळ सत्रातील शाळा मधल्या सुट्टीत सोडतांना पालक घेण्यासाठी येईपर्यंत शाळेतच मुलांना थांबवा, अशी सूचना करण्यात आली होती, असे नमूद केले.
चोपडा लॉन्स परिसरातील रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन चिखलात अडकले. विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहचण्यासाठी उशीर होत असल्याने चालकाने इतरांच्या मदतीने वाहन चिखलातून बाहेर काढले. या ठिकाणी काही अंतरावर महापालिकेची घंटागाडीही चिखलात रुतली होती. सोमेश्वर समोरील रस्त्यावर सिटी लिंकची बसही रस्त्याच्या कडेला असलेल्या चिखलात रुतली.
