नाशिक : सलग महिनाभरापासून पाऊस हजेरी लावत असताना हंगामाच्या प्रारंभी जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये १६ हजार १४४ दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे २५ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १६ टक्क्यांनी अधिक आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ४४ टक्के जलसाठा आहे.

यंदा मान्सूनचे नेहमीच्या तुलनेत लवकर आगमन झाले. तत्पूर्वी वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मे महिन्यात सलग तीन ते चार आठवडे इतका पाऊस कधी झालेला नव्हता. हंगाम सुरू झाल्यानंतर पाऊस हजेरी लावत आहे. गतवर्षी मुसळधार पावसाने सर्वच धरणे ओसंडून वाहिली होती. यंदा समाधानकारक चित्र असेल, असा अंदाज वर्तविला जातो. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार सोमवारी जिल्ह्यातील धरणांमध्ये १६ हजार १४४ दशलक्ष घनफूट (२४.५९ टक्के) इतका जलसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी पाच हजार ४५९ दशलक्ष घनफूट (८.३१ टक्के) इतके प्रमाण होते. नाशिक शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणात २५०१ दशलक्ष घनफूट (४४.४२ टक्के), काश्यपी ९२० (२८.५६), गौतमी गोदावरी १६६ (८.८९), आळंदी ९२ (११.२७) असा जलसाठा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार धरणे कोरडी होण्याच्या मार्गावर

पुणेगाव आणि माणिकपुंज ही धरणे पूर्णत: कोरडीठाक असून भोजापूर, केळझर यांनीही तळ गाठला आहे. बोटावर मोजता येतील इतक्याच धरणांची स्थिती समाधानकारक आहे. पालखेड (४२.४९), करंजवण (१०.६७), वाघाड (३.५२), ओझरखेड (२३.१०), तिसगाव (२.६४), दारणा (३५.५६), भावली (१८.२०), मुकणे (३४.१८), वालदेवी (२०.६५), कडवा ((१५.६४), नांदूरमध्यमेश्वर (१००), भोजापूर ((०.५५), चणकापूर (२४.३१), हरणबारी (२७.५३), केळझर (२.५२), गिरणा (२१.८९), पुनद (२५.४२) टक्के असा जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.