नाशिक – आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आलेल्या रामकाल पथ प्रकल्पांतर्गत गोदावरी नदी काठावरील घाट परिसरात सुधारणा व विकासाची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारपासून पुढील दोन महिने म्हणजे १६ जुलैपर्यंत उपरोक्त घाट परिसरात नागरिकांना प्रवेश व हालचालींना तात्पुरती बंदी राहणार आहे.

रामकुंड परिसरात देशभरातून दररोज हजारो भाविक येतात. या काळात दशक्रिया विधी व इतर विधी लगतच्या पटांगणात तात्पुरत्या शेडमध्ये केले जातील. तर पिंडदान व स्नान गांधी तलावात आणि अस्थि विसर्जन अस्थिकुंडात करण्यात येणार आहे.

कुंभमेळ्यानिमित्त एकाचवेळी हाती घेतलेल्या रस्त्यांच्या कामामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते खोदले गेले असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर खोदलेले रस्ते बुजवण्याची कुठेही घाई दिसत नसताना महापालिकेने आता गोदा काठावर प्रवेशास निर्बंध लागू केले आहे.

महापालिकेच्यावतीने रामकाल पथ प्रकल्पांतर्गत घाट परिसरात सुधारणा व विकासाची कामे करण्यात येणार आहे. दोन महिने रामकुंड व आसपासचे घाट बंद राहणार असल्याने मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. घाट कशा प्रकारे विकसित केले जाणार आहेत याचे सादरीकरण करण्यात आले. पुरोहित संघाने दशक्रिया विधी व इतर विधींसाठी यशवंत महाराज पटांगण व भाजी पटांगण येथे तात्पुरते शेडमध्ये करण्यास आणि स्नान गांधी तलाव येथे आणि अस्थि विसर्जन अस्थि कुंडात करण्याबाबत चर्चेअंती सहमती दर्शविली.

पुरोहित संघाची मागणी

गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी २४ तासात रामकुंड परिसरात किमान एक लाख भाविक येत असल्याचा अंदाज व्यक्त केला. नदी काठावरील घाट परिसर मोकळा असून चारही बाजुने येण्यासाठी रस्ते आहेत. त्यामुळे गर्दी लक्षात येत नाही. भाविकांची फिरती यात्रा असते.

रामकुंडात मार्जन, कोणी स्नान, कोणी तर्पण श्राद्ध करतात. काही लोक अस्थि विसर्जनासाठी येतात. याच ठिकाणी दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध, त्रिपिंडी श्राध्द आदी पूजाविधी केल्या जातात. यापूर्वी वस्त्रांतर गृहाच्या खालील भागात व गांधी ज्योत जवळील छत्रीत पूजाविधी होत असे. वस्त्रांतर गृह पाडल्याने पूजाविधीसाठी जागा राहिली नाही. त्यामुळे भाविकांच्या पूजाविधीसाठी पुरोहित संघाला या ठिकाणी इमारत उपलब्ध करावी आणि काक स्पर्शासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्याची मागणी पुरोहित संघाकडून करण्यात आली.