नाशिक – उत्सवप्रिय असलेल्या नाशिकची रंगपंचमीही खासच असते. ‘रहाड’ संस्कृतीमुळे नाशिकची रंगपंचमी खास बनते. यंदाही रंगपंचमीसाठी शहरातील रहाडी रंगांनी भरुन सज्ज झाल्या आहेत. या रहाडींची विधीवत पूजा झाल्यानंतर दुपारनंतर या रहाडींमध्ये डुंबण्याची एकच स्पर्धा तरुणाईमध्ये सुरु होईल. रहाडी सध्या पाण्याने भरण्यात आल्या आहेत. त्यांच्यात रंग टाकण्याची प्रक्रियाही दुपारपर्यंत पूर्ण होईल.
नाशिकमध्ये होळी आणि धुलिवंदनला रंग खेळला जात नाही. नाशिकमध्ये रंगपंचमी जोरात साजरी केली जाते. नाशिकमध्ये पेशवेकालीन अनेक रहाडी आहेत. रहाड म्हणजे पेशवेकाळात बांधलेले मोठे हौद. साधारणपणे एखाद्या छोट्या बारवप्रमाणे यांचे स्वरुप असते. दरवर्षी नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी या रहाडी खोदल्या जातात. आणि रंगपंचमीनंतर पुन्हा त्या मातीने बुजविल्या जातात. या रहाडी प्रामुख्याने जुने नाशिक आणि पंचवटी परिसरात आहेत. त्यापैकी यंदाच्या रंगपंचमीसाठी सात रहाडी तयार झाल्या आहेत.
पेशवे काळात या रहाडी पेशव्यांच्या सरदारांच्या ताब्यात होत्या. पेशवे गेल्यानंतर शहरात ठिकठिकाणी ज्या तालमींचे म्हणजेच व्यायामशाळांचे अस्तित्व निर्माण झाले. त्यांच्या ताब्यात त्या गेल्या. काही वर्षांपासून त्या त्या परिसरातील मंडळांकडूनच त्यांचे व्यवस्थापन बघितले जात आहे.नाशिकमध्ये जुन्या काळात म्हणजेच १८ व्या शतकात १८ पेक्षा अधिक रहाडी होत्या, असे सांगितले जाते. त्यातील काही बुजल्या गेल्या. काही रहाडींच्या ठिकाणी वाडे बांधले गेले. त्यामुळे काही रहाडी कायमच्या अस्तंगत झाल्या.
आता शहरातील सात रहाडी रंगपंचमीसाठी तयार झाल्या आहेत. त्यात शनी चौक, दिल्ली दरवाजा, तिवंधा, मधली होळी, तांबट लेन आणि तांबट लेन येथील रहाडींचा समावश आहे. तसेच जुने नाशिकच्या मेनरोड भागातील राजेबहाद्दर लेन येथील रहाड सुमारे ८० वर्षानंतर यंदा उकरण्यात आली आहे. अशाप्रकारे शहरात यंदाची रंगपंचमी सात रहाडींमध्ये होणार आहे. या प्रत्येक रहाडींची खोली वेगवेगळी असते. साधारणपणे १० फूटपेक्षा अधिक खोली असते.
या प्रत्येक रहाडीचा रंगही वेगळा असतो. यंदा खुल्या करण्यात आलेल्या राजेबहाद्दर लेनमधील रहाडीत केशरी, शनी चौकातील रहाडीत गुलाबी, दिल्ली दरवाजा केशरी, तिवंधा पिवळा, मधली होळी केशरी, तांबट लेन केशरी आणि दंडे ह्ननुमान चौकातील रहाडीतील रंग पिवळा राहणार आहे. रंगपंचमीच्या सात ते आठ दिवस आधी या रहाडी उकरण्यास सुरुवात होते. त्यातील सर्व माती बाहेर काढून रहाडींची स्वच्छता केली जाते. रंगरंगोटी केली जाते. या रहाडींमध्ये नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकले जातात. कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर केला जात नाही. त्यामुळे या रहाडींमध्ये डुंबल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.
सर्व रंग विविध प्रकारच्या वनस्पतीच्या फुलांपासून तयार केले जातात. हजारो नागरिक या रहाडींमध्ये डुंबतात. रहाडींमध्ये डुंबल्यावरच रंगपंचमी खेळल्याचे समाधान नाशिककरांना लाभते. रहाडींचे पूजन झाल्यानंतर परंपरेनुसार जे मानकरी असतात, ते सर्वप्रथम रहाडीत उड्या मारतात. त्याठिकाणी त्यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर मानकरी रहाडमध्ये प्रथम उडी मारतात. त्यानंतर मग रहाडीत डुंबण्यासाठी एकच चढाओढ सुरु होते. रहाडीत जी उडी मारली जाते, तिला ‘धप्पा’ म्हटले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. उंचावरुन पाण्यात उडी मारल्यावर ‘धप्प’ असा आवाज येतो.
