नाशिक – रविवारी शहरात रंगपंचमी उत्साहात साजरी झाल्यानंतर काही जणांनी गोदापात्रात हुल्लडबाजी केली. गोदापात्रात डुबकी मारतांना टवाळखोरांनी एकमेकांना पादत्राणे फेकून मारत आक्षेपार्ह कृती केल्या. विशेष म्हणजे, रामकुंड परिसरात महापालिका अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी- कर्मचारी यांच्यासमोर हा प्रकार होत असतांना कोणीही हुल्लडबाजांना आवरण्याचा प्रयत्न केला नाही. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंगप्रेमी नाशिककर रंगपंचमीच्या दिवशी पेशवेकालीन रहाडीत डुंबतात. त्यानंतर काहींची पाऊले घरी तर काही गोदावरी नदीपात्रात स्नानासाठी जातात. रविवारी शहरात रंगपंचमीनिमित्त ठिकठिकाणी वर्षा नृत्य तसेच इतर कार्यक्रममांचे आयोजन करण्यात आले होते. रहाडीत डुंबल्यानंतर अनेकांनी गोदापात्र गाठले. त्यामुळे गोदाकाठ रंगप्रेमींच्या गर्दीने न्हाऊन निघाला. याच दरम्यान काही हुल्लडबाज रामकुंडात उतरले. पायातील चपला वर काढत एकमेकांना मारून फेकल्या. अंगावरील कपडे काढून फेकले. आक्षेपार्ह वर्तन करण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोदाकाठावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
या सर्व प्रकाराला नाशिक पुरोहित संघाने आक्षेप घेतला. पुराेहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी तीव्र भावना व्यक्त केली. गोदाकाठावरील रामकुंड परिसरात संस्थेच्या वतीने गंगापूजन, गंगा आरती होते. या ठिकाणी गंगा मातेचे मंदिर आहे. दररोज या ठिकाणी अस्थी विसर्जन, पिंडदान, श्राध्द आदी विधी होतात. तसेच गंगामातेच्या जलात कपालेश्वर तसेच घरातील देव देवतांना अभिषेक केला जातो. अशा पवित्र ठिकाणी चप्पल मारून फेकणे, अंगावरील कपडे काढणे असे हिडीस प्रकार झाले. असे वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी पंचाक्षरी यांनी केली.
दरम्यान, गोदाकाठ विस्तीर्ण असतांना या ठिकाणी केवळ एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने संशयितांची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान आहे. पोलीस प्रशासन कुचकामी ठरलेले असतांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोदा प्रदुषण मुक्तीसाठी या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन प्रदुषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित असतांना महापालिका तसेच पोलीस विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली गेल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.
कठोर कारवाई व्हावी
गोदावरी नदी आपली माता आहे. गोदावरीचे पावित्र्य मलिन करत महिला दिनाच्या दिवशी घाणेरडे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. तसेच त्या ठिकाणी असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचीही सखोल चौकशी व्हावी – देवांग जानी (पर्यावरण प्रेमी)
