नाशिक – राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून ३० सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, उमेदवार तसेच भरती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित विविध घटकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत हा संवाद होणार आहे. नाशिकसह धुळे, जळगांव, नंदूरबार, अहिल्यानगर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा, विषयतज्ज्ञ आणि संबंधित घटक या संवादात सहभागी होता येणार आहेत. राज्याच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत पोलीस महासंचालक सदानंद दाते, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामस्वामी, नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल (निवृत्त) अजित भोसले आणि आयआयटी मुंबईचे प्राध्यापक श्यामप्रसाद करगड्डे यांचा समावेश आहे. या समितीने आतापर्यंत राज्यातील पाचही महसूल विभागांचा दौरा करून स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांशी संवाद साधला आहे. नाशिक महसूल विभागाचा दौरा हा समितीचा शेवटचा टप्पा असणार आहे.
परीक्षा प्रक्रियेतील अडचणी मांडण्याची संधी
भरती परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर येणाऱ्या अडचणी, उमेदवारांचे अनुभव, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रश्नपत्रिका व परीक्षा सुरक्षितता, तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण व्यवस्था तसेच परीक्षा पद्धतीत आवश्यक असलेल्या सुधारणांबाबत या संवादादरम्यान थेट मते व सूचना मांडता येणार आहेत. उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करण्यात येत आहे. प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि उमेदवारांचे अनुभव, त्यांच्या अडचणी तसेच त्यांच्या सूचना या सुधारणांसाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह नाशिक महसूल विभागातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले अनुभव, अडचणी आणि सूचना मांडाव्यात.
आपली सूचना अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह भरती प्रक्रियेसाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याने तसेच राज्यातील स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या प्रक्रियेत नाशिकसह विभागातील सर्व जिल्ह्यातील नागरिक, अभ्यासक, शैक्षणिक संस्था, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी व संबंधित घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. तसेच ज्या नागरिकांना, अभ्यासक, शैक्षणिक संस्था, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी व संबंधित घटकांना समक्ष उपस्थित राहणे शक्य नाही. त्यांनी आपल्या सूचना, अभिप्राय nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठवावे. असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कळविले आहे.
