नाशिक – आयुष्याच्या एका वळणावर आपल्या जोडीदाराचा हात सुटला… तिची किंवा त्याची साथ सुटली तर येणारं एकटेपण.. आयुष्याची पोकळी अशा स्थितीत आयुष्यात जोडीदार हवा या करता होणारी मनाची घुसमट मात्र समाजाचे असलेला दबाव या सगळ्यांवर मात करत नांदगाव तालुक्यातील नागापुर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व जिल्हा परिषद नाशिकच्या नवचेतना अभियानांतर्गत एकल महिला – एकल पुरुष आंतरजातीय विवाह सोहळ्यात नुकताच नितीन गरुड व वधू प्रमिला धुराडे यांनी गावकऱ्यांच्या साक्षीने नव्या आयुष्याची सुरुवात केली.

आधुनिक युगातही विधुर किंवा विधवा विवाहाबाबत संकोचाची भूमिका अनेक ठिकाणी दिसून येते. समाजमाध्यमांमुळे माणसे आभासी पातळीवर जोडली गेली असली, तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र एकाकीपणाची भावना वाढत आहे, या पार्श्वभूमीवर एकल महिलांच्या बाबतीत संवेदनशील समाजाची निर्मिती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘नवचेतना अभियान’ राबविण्यात येत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून नागापूर ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून, तसेच शासनाच्या सक्रिय सहभागातून, येथे एक अनोखा आंतरजातीय विवाह सोहळा संपन्न झाला. नागापूर येथील एकल पुरुष नितीन गरुड व एकल महिला प्रतिभा (प्रमिला) धुराडे यांनी नवजीवनाची सुरुवात केली. नितीन यांच्या पत्नीचे सुमारे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते, तर प्रतिभा यांच्या पतीचे अपघाती निधन झाल्याने दोघेही दीर्घकाळ एकाकी जीवन जगत होते; त्यांच्या मुलांचे विवाह होऊन ते स्वतंत्र संसारात स्थिरावल्यानंतर या दोघांच्या आयुष्यातील एकटेपणाची दखल गावपातळीवर घेण्यात आली.

सरपंच राजेंद्र पवार व ग्रामपंचायत अधिकारी दिलीप निकम यांनी पुढाकार घेत संबंधितांशी चर्चा करून त्यांना विवाहासाठी प्रोत्साहित केले. समाजानेच पुढाकार घेत हा विवाह घडवून आणल्याने हा सोहळा गावासाठी भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला.

विशेष म्हणजे विविध अठरापगड समूहांचे सहअस्तित्व असलेल्या नागापूर गावाने स्वतः पुढाकार घेत जातीयतेच्या पलीकडे जाऊन हा विवाह सोहळा पार पाडला. या सोहळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, युवा सेना जिल्हाप्रमुख फरान खान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विवाह सोहळ्यात संबळे व पारंपरिक वाद्यांच्या निनादात विधी पार पडले, अतिथींचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. बॅंड, वाजंत्री, पारंपरिक चालीरीती, आशीर्वाद आणि लग्नानंतरची आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर उत्सवी झाला. ग्रामस्थांनी हा सोहळा आपल्या कुटुंबातीलच समारंभ असल्याप्रमाणे साजरा केला. ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष योजना म्हणून ‘सरपंच शुभमंगल योजना’ अंतर्गत रुपये अकरा हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते नवदांपत्यास प्रदान करण्यात आला.