नाशिक – कुंभमेळ्यासाठी तपोवनातील १८०० झाडे महापालिका प्रशासनाच्या वतीने तोडणे किंवा पुनर्रोपण करण्याच्या हालचाली सुरु आहेत. महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी नाशिककर एक होऊ लागले आहेत. हरकतींवरील जनसुनवाईत पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांची भूमिका स्पष्ट झाली. तपोवनातील झाडे वाचली पाहिजेत, यासाठी आणि या मोहिमेला असलेला जनाधार स्पष्ट व्हावा, याकरिता पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी एकत्र येत स्वाक्षरी उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला एका दिवसात २० हजारांहून अधिक नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.
कुंभमेळा हिंदू संस्कृतीतील महत्वाचा उत्सव आहे. उत्सवात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर कुंभनगरीत दाखल होतात. प्रत्येक कुंभमेळ्याला गर्दीचा आलेख उंचावत असतांना ही गर्दी प्रशासनाला आव्हानात्मक ठरत आहे. नाशिक येथे कुंभमेळ्यात साधू, महंतांसाठी तपोवनात साधुग्राम वसविण्यात येते. आगामी कुंभमेळ्यात साधू, महंताची गर्दी वाढणार असल्याने प्रशासनाने त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी तपोवनातील १८०० झाडे कापणे, पुनर्रोपण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. प्रशासनाच्या या निर्णयाला नाशिककरांनी विरोध दर्शविला आहे. जनसुनवाईतही नाशिककरांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
या भूमिकेस पाठबळ मिळावे म्हणून तपोवन वाचवा- झाडे वाचवा ही स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये १८ वर्षांपासून ८० वर्ष वयोगटातील मंडळी सहभागी झाली आहेत. तपोवनात चिपको आंदोलन सुरू ठेवत शहराचा मध्यवर्ती भाग, कॉलेजरोड, पंचवटी, पाथर्डी फाटा, इंदिरानगर यासह वेगवेगळ्या भागांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. बुधवारपासून या मोहिमेला सुरूवात झाली. यामध्ये डॉक्टर, अभियंते, शिक्षक, वकील, समाजसेवक, विद्यार्थी असे वेगवेगळे घटक सहभागी झाले आहेत. याविषयी समन्वयक प्रशांत लोणारी यांनी माहिती दिली. मोहिमेसाठी शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था, व्यावसायिक यासह वेगवेगळ्या घटकांशी संपर्क करीत आहोत. ही मोहीम जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे लोणारी यांनी सांगितले.
तपोवनातील १८३४ वृक्ष, यामध्ये ती देशी असो वा विदेशी वृक्ष तोडण्याच्या राज्य शासन आणि महानगरपालिका प्रशासनाच्या निर्णयाला नाशिककर या नात्याने माझा विरोध आहे. वृक्षतोड निर्णय रद्द करावा, या मागणीची अंमलबजावणी करण्यात यावी, असा स्वाक्षरी मोहिमेतील अर्जात उल्लेख आहे. दुसरीकडे, फेसबुक, व्हॉट्स अपच्या माध्यमातून तपोवन वाचवा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. याशिवाय काही रिल्स तयार करुन पर्यावरण संवर्धनासाठी ही मोहीम कशी महत्वाची, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.
