नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रस्तावित नाशिक परिक्रमा मार्गाच्या (रिंगरोड) संरेखनात सत्ताधाऱ्यांचे निकटवर्तीय बिल्डर, बड्या अधिकाऱ्यांच्या जागांना भाव मिळावे म्हणून बदल केले गेल्याच्या आक्षेपांची पुढील तीन दिवसांत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नाशिक रिंगरोड परिसरात विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मागील तीन वर्षात कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का, याचाही शोध घेतला जाणार आहे.

नाशिक रिंगरोड प्रकल्पाचा विषय संरेखन, भूसंपादनाचे दर आणि अन्य कारणांवरून गाजत आहे. शहराजवळील २५ गावातून जाणाऱ्या या मार्गासाठी ३६५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांचे निकटवर्तीय, बिल्डर, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या जागा रिंगरोडच्या दर्शनी भागात आणण्यासाठी संरेखनात बदल केल्याचा आरोप बाधित शेतकरी व विरोधकांकडून होत आहे. या प्रकल्पाने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी आमदार सरोज अहिरे यांनी विधानसभेत आंदोलन केले होते. आमदार विजय वडेट्टीवार यांनी नाशिक रिंगरोडच्या संरेखनात जाणीवपूर्वक, उद्दिष्ट ठेवून बदल करण्यात आल्याचा आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप लक्षवेधी सूचनेद्वारे केला होता. आमदार अहिरे यांनी प्रश्न उपस्थित करत आक्षेप घेतले. यावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी उत्तर दिले.

कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची (अलाइनमेंट) पुढील तीन दिवसांत चौकशी करण्यात येईल, तसेच रिंगरोडमध्ये ज्यांनी जमिनी घेतल्या, त्या प्रकरणाची चौकशी १५ दिवसांत केली जाईल, असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. रिंग रोडच्या कामात कोणत्याही शेतकऱ्यावर बळजबरी केली जाणार नाही, तसेच त्यांना कायद्यानुसार योग्य आणि समाधानकारक मोबदला दिला जाईल, असे आश्वासनही दिले.

तीन वर्षांतील जमीन खरेदीची चौकशी

नाशिक रिंगरोडची संरेखन नेमकी का बदलली गेली. उद्दिष्ट ठेवून जाणीवपूर्वक बदलली गेली का, याची चौकशी तीन दिवसांत केली जाईल. रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या तीन वर्षांत या भागात कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का, याचा शोध घेतला जाईल. जर ही संरेखन जाणीवपूर्वक बदलली गेली असेल, तर त्याची अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले

पवन दत्ता निर्दोष

मातोरी, मुंगसरा गावात मोजणीवेळी उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांनी शेतकऱ्यांना दंडुक्याने मारहाण केल्याचा आरोप सातत्याने होत आहे. यावरून स्थानिक पातळीवर आंदोलने झाली. विधानसभेत महसूलमंत्री बावनकुळे यांनी आयएएस अधिकारी दत्ता यांचा बचाव केला. मोजणीवेळी दत्ता यांनी हेल्मेट का घातले, याचे कारण त्यांनी दिले. त्या दिवशी मोजणीदरम्यान काही आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, रॉकेलच्या बाटल्या आणल्या गेल्या आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. दगडफेक किंवा घासलेट हल्ल्यापासून स्वतःच्या बचावासाठी आणि सुरक्षेसाठी त्यांनी हेल्मेट घातले होते, त्यामुळे या अधिकाऱ्याचा कोणताही दोष नाही,असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.