नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या प्रस्तावित ७७.४० किलोमीटरच्या परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोड पैकी ४७.९ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मान्यता दिली आहे. यापूर्वी ६६.१५ किलोमीटर लांबीचा नाशिक परिक्रमा मार्ग विकसित करण्याचे नियोजन होते. यात काही बदल करीत केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने हा मार्ग ७७.४० किलोमीटरपर्यंत विस्तारला आहे.

गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मुंबई, जव्हार, गुजरात, छत्रपती संभाजी नगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई अशा मार्गाने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी या मार्गातील रस्त्यांचे बळकटीकरण, त्या रस्त्यांवर वाहनतळांची सुविधा निर्माण करण्याचे नियोजन आहे.

कुंभमेळ्यात शहरातील विद्यमान वाहतूक सुविधा आणि सार्वजनिक व्यवस्थांवर प्रचंड ताण पडू शकतो. याचा विचार करून शहरातील वाहतुकीचे योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी नाशिक शहराभोवती नवीन वळण रस्ता (रिंग रोड) अर्थात परिक्रमा मार्गाचे नियोजन राज्य सरकारने केले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मान्यता दिल्यामुळे भूसंपादनाच्या कामाला वेग प्राप्त होणार आहे. मंत्रालयाने नाशिक शहराभोवती ७७.४० किलोमीटर परिक्रमा मार्गातील ४८ किलोमीटर लांबीच्या बांधकाम खर्चाला मान्यता दिली, पूर्वीच्या प्रस्तावित मार्गाच्या तुलनेत या मार्गाची लांबी वाढली. त्यामुळे बांधकाम खर्च वाढणार असला तरी रस्ते ओलांडणे वा अस्तित्वातील पायाभूत टाळल्या जातील, असे प्रशासकीय वर्तुळातून सांगितले जाते.

पहिल्या टप्प्यातील परिक्रमा मार्गासाठी सुमारे ५८०५ कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. यातील भूसंपादनाचा २६५० कोटींचा भार राज्य सरकार उचलणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे उर्वरित २९ किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम व भूसंपादन राज्य सरकार करणार आहे. मंजूर आराखड्यानुसार, संरेखन आता मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील विल्होली गावाजवळील व्हीटीसी फाटा येथून सुरू होते. तो त्र्यंबक रस्त्याला जोडला जाईल. परिक्रमा मार्ग चारपदरी असणार आहे. ताशी १०० किलोमीटर वेगाने वाहने मार्गक्रमण करतील, अशी त्याची रचना आहे. या योजनेत तीन मोठे पूल, १८ छोटे पूल, २९ वाहनांचे भुयारी मार्ग आदींचा समावेश आहे. यासाठी ३०५ हेक्टर जमीन आवश्यक असेल. १८ गावांमधून हा मार्ग जाणार असून त्यासाठी सुमारे २७ घरे पाडावी लागतील, असे सांगण्यात येते. परिक्रमा मार्गामुळे दळणवळण सुधारेल. शहराच्या हद्दीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. माल वाहतुकीत सुधारणा होऊन शहरातील वाहनांची गर्दी कमी होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.