नाशिक – शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे नाशिक रिंगरोडच्या मोजणीवेळी काही अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाईल, असे आश्वासन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
नाशिक रिंगरोडच्या मोजणीवेळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना घरात शिरून मारहाण केली, एका प्रशासकीय अधिकाऱ्याने महिलांशी गैरकृत्य केल्याचे आरोप होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी दरी, मातोरी, मुंगसरे, गोवर्धन परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. मातोरी, मुंगसरे गावातील गावठाण भागातून मार्ग गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल. त्या अनुषंगाने बदलाबाबत विचार करावा, अशी मागणी केली जात आहे. सक्तीच्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलक, बाधित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात चर्चा केली. त्यांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके- आहेर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील आदी उपस्थित होते.
रिंगरोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल. जिल्हाधिकारी प्रसाद हे लवकरच दरी, मातोरी, मुंगसरे, गोवर्धन या गावांना भेट देतील. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित राहतील. ते शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्ग काढतील. या गावांमध्ये मोजणीवेळी अनुचित प्रकार घडला असेल, तर त्याची चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. बैठकीत आमदार खोसकर यांनी विविध सूचना केल्या. यावेळी शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले.
महिला शेतकऱ्यांनी तक्रार करावी…
महिला शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील, तर त्यांनी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्याकडे नोंदवाव्यात, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी
सांगितले. उच्च न्यायालयात प्रकरण असले तरी कार्यवाहीस स्थगिती नसल्याने दोन्ही गावातील मोजणी करण्यात आली. १९ क्रमांकाची नोटीस बजावल्यानंतर शेतकरी हरकती घेऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
