नाशिक – नाशिक रिंगरोड प्रकल्प वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत आहे. या प्रकल्पामुळे बाधित होत असलेली १४ गावे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २९ जवळील चिंचखेड ते दिंडोरी परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. रिंग रोडची रचना (अलायमेंट), जमिनींचा मोबदला आणि जमीन खरेदी प्रक्रियेतील कथित अनियमितता याविरोधात २५ ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरू करण्याचा तसेच त्याच दिवशी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानातून मुंबईच्या आझाद मैदानाकडे मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिकमधील कालिका माता मंदिराच्या सभागृहात छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रिंगरोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीस नाशिक तालुक्यातील १४ गावांतील आणि महामार्ग क्रमांक २९ मुळे बाधित होत असलेल्या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक रिंगरोड रचनेप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केल्याचे सांगण्यात आले. संबंधित समितीचा अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. समितीचा जाहीर होईपर्यंत कोणतीही जमीन खरेदी, मोजणी अथवा पुढील कार्यवाही करू नये, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली. रिंगरोडमुळे बाधित शेतकऱ्यांवर दबाव आणण्यासाठी त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात २५ टक्के कपात करण्याची भीती दाखवली जात असल्याचा आरोप करण्यात आला.

नाशिक रिंगरोडची रचना योग्य पध्दतीने झालेली नाही. अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली. या प्रक्रियेत सहभागी असलेल्या काही अधिकारी आणि संबंधित कंपनीविरोधात यापूर्वी शासनाकडे पुरावे सादर केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. संबंधितांवर कारवाई झाली असल्याचे सांगण्यात येत असताना त्याच रचनेच्या आधारे जिल्हा प्रशासन, प्रांताधिकारी आणि एमएसआयडीसीकडून जमीन खरेदीची प्रक्रिया का सुरू ठेवली जात आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पाथर्डी परिसरातील केवायसी प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणीही जमीन खरेदी प्रक्रियेला सहकार्य करणार नसल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रशासनाने दबाव न टाकता सकारात्मक भूमिका घ्यावी, असे करण गायकर यांनी सूचविले.

नाशिक रिंगरोडमुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गोल्फ क्लब मैदानातून मुंबईतील आझाद मैदानाकडे मोर्चा काढण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. याशिवाय २८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी बाधित महिला शेतकरी त्यांना राखी बांधून आपल्या मागण्या मांडणार आहेत. नाशिक रिंग रोडची रचना (अलायमेंट) आणि मोबदल्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत १४ गावांतील जमीन खरेदी प्रक्रिया थांबवावी, तसेच मोबदल्याचा प्रश्न निकाली निघेपर्यंत महामार्ग क्रमांक २९ मधील चिंचखेड ते जोपुळ परिसरातील मोजणीचे काम स्थगित ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बैठकीस नाशिक रिंग रोड आणि महामार्ग क्रमांक २९ मुळे बाधित परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.