नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक वळण रस्ता अर्थात रिंग रोडसाठी सुरू असलेल्या भू संपादन प्रक्रियेतील मोजणीला शनिवारी वेगळे वळण लागले. मातोरी, मुंगसरा भागात काही शेतकऱ्यांनी विरोध केला. तेव्हा पोलिसांनी घरात शिरून महिला व पुरूषांना मारहाण केल्याची तक्रार होत आहे.

संबंधितांना त्यांच्या घरातून फरफटत बाहेर काढण्यात आले. या संदर्भातील चित्रफिती प्रसारित झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रशासनाने दडपशाही चालविल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी हे आक्षेप फेटाळले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शासनाने ६६ किलोमीटर लांबीच्या नाशिक वळण रस्त्याला मान्यता दिली आहे. शहरालगतच्या २५ गावांमधून हा मार्ग जाणार आहे. रिंग रोडसाठी ३६५ हेक्टर खासगी जमीन संपादीत केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी काही गावातील मोजणीचे काम पूर्ण झाले असून काही गावात ते बाकी आहे.

शनिवारी दरी मातोरी परिसरात मोजणीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मोजणीला महिला व शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. काही ग्रामस्थ मोजणी होऊ नये यासाठी आपल्या घरात गेले. यावेळी पोलिसांनी घरात शिरून महिला व अन्य शेतकऱ्यांना बाहेर काढले, त्यांना मारहाण केली, असा आरोप ग्रामस्थांनी केला. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना ही प्रक्रिया कशी पार पडली, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.

मारहाणीची चौकशी करण्याची मागणी

मातोरी व मुंगसरा येथील घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी, शेतकऱ्यांना झालेल्या मारहाणीबाबत दोषी अधिकारी व संबंधितांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, नाशिक प्रांत अधिकारी पवन दत्ता यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि शेतजमिनींचे बळजबरीचे सुरू असलेले संपादन तात्काळ थांबवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, योग्य मोबदला देऊनच पुढील कार्यवाही करावी. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे हक्क पायदळी तुडवले जात असतील, तर ते मान्य होणार नाहीत. या मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना केवळ ताब्यात घेतले

दरी, मातोरी परिसरात मोजणीचे काम सुरू असताना काहींनी विरोध करीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. संबंधितांचा आधीपासून भूसंपादनाला विरोध आहे. संबंधितांना ताब्यात घेण्यात आले. मोजणी झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. – मधुरा नाईक (पोलीस निरीक्षक, नाशिक तालुका पोलीस ठाणे).