नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक रिंग रोड मार्गाच्या भूसंपादनावरून मोठा गदारोळ उडाला आहे. मोजणीवेळी त्र्यंबकेश्वर-इगतपुरी तालुक्यातील अधिकाऱ्याने घरात शिरून शेतकरी व महिलांना मारहाण करण्याचे आदेश दिले. महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारी कृत्ये केली. संबंधिताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला त्वरित निलंबित करावे, अशी मागणी मातोरी, मुंगसरे येथील शेतकऱ्यांनी आंदोलनातून केली. कुंभमेळ्याच्या नावाखाली हे प्रकार सुरू राहिल्यास कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाशिक बंदी घालण्याची वेळ आणू देऊ नका, असा इशाराही आंदोलकांनी दिला.
शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सरकारने ६६ किलोमीटरच्या नाशिक रिंग रोडला मान्यता दिलेली आहे. २५ गावांमधून जाणाऱ्या या मार्गासाठी ३६५ हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाणार आहे. त्या अंतर्गत गेल्या शनिवारी मातोरी, मुंगसरे येथे मोजणीवेळी घडलेल्या घटनेने रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. त्यास विरोध केला असता अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने शेतकरी कुटुंबांना घरात शिरून मारहाण केली, त्यांना फरफटत बाहेर नेले, अशी तक्रार होत आहे. या संदर्भातील चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या. यंत्रणेकडून असा प्रकार घडला नसल्याचा दावा केला जात आहे.
मातोरी, मुंगसरे भागात घडलेल्या घटनेचे पडसाद सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनातून उमटले. भूसंपादनाचा विषय न्यायप्रविष्ट असताना रात्री व्हॉट्सॲपवर मोजणीच्या नोटीस पाठवल्या. इगतपुरी विभागातील अधिकाऱ्याने पोलिसांच्या मदतीने सक्तीने मोजणी प्रक्रिया राबविली. आक्षेप घेणाऱ्या शेतकरी व महिलांना घरात शिरून मारहाण करण्यात आली, त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या भागात आधीच दोन रस्ते मंजूर आहेत. त्यांची दुरुस्ती व विकास केल्यास नव्या रस्त्याची गरज पडणार नाही. नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे अल्पभूधारक शेतकरी भूमीहिन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणात शासनाने पारदर्शकता राखावी, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मोजणी वा तत्सम कुठलीही प्रक्रिया राबवू नये. यासाठी मंत्री, अधिकारी व शेतकरी प्रतिनिधीचा समावेश असलेली समिती स्थापन करावी, अशी मागणी आंदोलकांनी निवेदनातून केली.
इगतपुरीतील अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. कुंभमेळ्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाशिक बंदी घालण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा करण गायकर यांनी दिला आहे.
फलकांद्वारे प्रश्न, मागण्या
आंदोलनात ‘पोलीस प्रशासनाला पुढे करून लाठीचार्ज करणारा प्रांत अधिकारी पवन दत्ता यांना अटक करा, गिरीश महाजन हटाओ, नाशिक बचाओ, महिलांवर हात उचलणे हाच का तुमचा विकास’ असे विविध फलक घेऊन महिला व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. निवेदनावर करण गायकर, राजू देसले, साहेबराव दातीर यांच्यासह शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
