नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासंदर्भातील कामांवरुन नाशिकसह त्र्यंबकश्वर आणि दिंडोरी या तालुक्यांमध्ये स्थानिक विरुध्द प्रशासन असा वाद निर्माण होत असताना आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार हिरामण खोसकर यांनीच थेट राज्य सरकारला खडसावले आहे.
शनिवारी नाशिक रिंगरोड प्रकल्पासाठी जमीन मोजणीवेळी मातोरी आणि मुंगसरा येथे प्रशासनाकडून बंदोबस्तात मोजणी करण्यात आली. यावेळी विरोध करणाऱ्या शेतकरी कुटूंबांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला. प्रशासनाकडून त्याचा इन्कार करण्यात आला असताना या प्रकरणावरुन आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत.
शनिवारी आपण नाशिकमध्ये नव्हतो, त्यामुळे घटनास्थळी उपस्थित राहू शकलो नाही, असे आमदार खोसकर यांनी रविवारी माध्यमांना सांगितले.
कुंभमेळ्यातील कामांवरुन शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि दिंडोरी या ठिकाणी सारखीच परिस्थिती आहे. सरकार स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाही. सरकारला नाशिकमध्ये रिंगरोड करायचा होता, तर पाच वर्षापूर्वीच त्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे, त्यांची मानसिकता तयार करणे आवश्यक होते. परंतु, सरकार शेतकर्यांसह लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेत नाहीत. त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणावेळीही तेच दिसून आले. रस्त्याकाठी लहान-मोठे व्यवसाय करणाऱ्यांंना रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली हटविण्यात आले. आपण हा विषय विधीमंडळ अधिवेशनातही मांडला होता. यापूर्वी कुंभमेळे झाले नाहीत का, याच कुंभमेळ्यात असे काय वेगळे होणार, शेतकऱ्यांना उघडं पाडून कुंभमेळा करणार का, असे प्रश्न आमदार हिरामण खोसकर यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनाही या विषयावरुन सांगितले. शिखर समितीच्या बैठकीतही, शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची विनंती केली होती. परंतु, त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. आम्ही सत्तेमध्ये आलो म्हणजे, शेतकरी मारुन टाकायचे काय, असा प्रश्न करुन एका आजीला खूप मारले असल्याचे त्यांनी सांगितले.
असा अत्याचार, अशी मारझोड राहते का? शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांना योग्य भाव न देता थेट पोलीस बंदोबस्त लावतात, हे हे चुकीचे आहे. शेतकऱ्यांना रस्त्यावर उघडं पाडून कुंभमेळ्यासाठी काम चालू आहे. शेतकऱ्यांवर अन्याय आहे. शेतकऱ्यावर लाठीमार करणे, दमदाटी करणे हे चुकीचे आहे. यासंदर्भात सोमवारी पोलीस अधीक्षकांशीही चर्चा करणार आहे. रविवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कुंभमेळ्याचे काम करा. शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या, अशी मागणीही आमदार हिरामण खोसकर यांनी केली आहे.
आमदार खोसकर यांनी याआधीही त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणावरुन नाराजी व्यक्त केली होती. शेतकऱ्यांची बाजू घेतली होती. आता पुन्हा नाशिक रिंगरोड प्रश्नावरुन आमदार खोसकर उघडपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उतरले आहेत.
