नाशिक – नाशिक वर्तुळाकार मार्ग अर्थात रिंग रोडच्या भूसंपादनावेळी महिलांसह शेतकऱ्यांना झालेल्या कथित मारहाणीवरून संतप्त शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाधित शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कार्यालयात तासभर ठिय्या दिला.
प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याला मारहाणीचा अधिकार कोणी दिला, जमिनी जबरदस्तीने घेऊ शकत नाहीत, त्यांच्या मागण्या समजून घ्या, असा आग्रह त्यांनी धरला. मोजणीवेळी घडलेल्या कथित मारहाणीच्या घटनेवरून प्रशासनाने इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कुंभमेळ्यात शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी ६६ किलोमीटर लांबीच्या रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ३६५ हेक्टरचे भूसंपादन केले जाणार असून त्यास अनेक गावांमधून विरोध होत आहे. शनिवारी मातोरी, मुंगसरा गावात मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकरी व कुटुंबातील महिलांना उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांच्यासह पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार होत आहे.
बाधित शेतकरी आणि महिलांनी खासदार राऊत यांची भेट घेत त्या घटनेच्या चित्रफिती दाखवल्या. त्यानंतर काही वेळात राऊत हे संबधितांना घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कार्यालयात धडकले. त्यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद हे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीसाठी गेलेले होते. यामुळे राऊत, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गिते यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना तासभर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बसावे लागले.
सुमारे तासाभराने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दाखल झाल्यानंतर राऊत यांनी मोजणीवेळी झालेल्या घटनाक्रमावर चर्चा केली. उपविभागीय अधिकारी दत्ता यांच्याकडून झालेली मारहाण. सक्तीने केले जाणारे भूसंपादन यावरून तक्रारी करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मातोरी, मुंगसरे भागात ८० वर्षांच्या महिलेची जमीन रस्ता धरण, पाट अशा वेगवेगळ्या कारणांनी चार वेळा पूर्वीच संपादित झालेली आहे. इतर शेतकरी व महिलांची वेगळी स्थिती नाही. बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेणे आवश्यक आहे. भगिनींच्या जमिनी वाचल्या पाहिजेत. प्रशासन त्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊ शकत नाही, असे राऊत यांनी सूचित केले.
मोजणीवेळी शेतकऱ्यांना दंडुक्याने मारहाण केल्या प्रकरणी उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दिंडोरीतील प्रांताधिकाऱ्यांविषयी अनेक तक्रारी असून लवकरच त्या तालुक्याला भेट देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या संपूर्ण घटनाक्रमाबाबत जिल्हाधिकारी प्रसाद यांच्याशी संपर्क साधूनही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
हिच का नारीशक्ती ?
नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनात महिलांसह शेतकऱ्यांना झालेल्या कथित मारहाणीवरून खासदार राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले. मोदी सरकारने काय दर्जाचे अधिकारी महाराष्ट्रात पाठवले, त्यांना या राज्यातून बाहेर काढावे. संसदेत हा विषय उपस्थित केला जाईल. हिच भाजपची नारीशक्ती का, असा प्रश्न त्यांनी केला. या संदर्भात मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि आवश्यकता भासल्यास कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
