नाशिक – महिला लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक प्रकरणात सध्या पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी आणि न्यायालय अशा वाऱ्या करणाऱ्या भोंदू अशोक खरातला कुंभमेळा लाभदायक ठरतो की काय, अशी चिन्हे आहेत. कुंभमेळ्यानिमित्त नाशिक रिंगरोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प होणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया वेग घेत आहे. जमीन संपादनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यात प्रशासन व्यस्त आहे.
नाशिक रिंगरोड हा प्रकल्प कुंभमेळ्यासाठी महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेचे लक्ष या प्रकल्पाकडे आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या ६६ किलोमीटर रिंगरोड प्रकल्पात ज्यांच्या जमिनी येणार आहेत, त्यांना भरघोस मोबदला मिळण्याची शक्यता आहे. या जमिनींना काही कोटींचा मोबदला मिळणार आहे. लैंगिक शोषणासह फसवणूकीसारख्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला अशोक खरात आणि त्याच्या संपर्कातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने संगनमताने नाशिक रिंगरोडलगत जमीन खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. रिंगरोड ज्या भागातून जाणार आहे, त्या पाथर्डी परिसरातील सुमारे ३१८० चौरस मीटर (३१ गुंठे) जमीन अशोक खरातची मुलगी सृष्टी खरात आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे काही लाख रुपयांत खरेदी करण्यात आली होती. रिंगरोडचा मार्ग निश्चित होण्याआधीच संबंधित जमीन खरेदी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. आता ही जमीन रिंगरोडमध्ये येत असल्याने पाचपट दराने मोबदला मिळणार असून काही लाखांच्या या जमिनची किंमत दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.
अशोक खरातने त्याला ज्योतिष विद्या अवगत असल्याचे सांगून अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यात काही शासकीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. अधिकाऱ्यांशी झालेल्या सलगीचा फायदा खरातने मोक्याच्या ठिकाणी जमीन खरेदीत करुन घेतला. पाथर्डीप्रमाणेच गौळाणे गावातील गट नंबर ४७/२ मध्ये अशोक खरातच्या नावे ४० गुंठे तर त्याची पत्नी कल्पना खरातच्या नावे ३१.२० गुंठे जमीन असल्याची नोंद आहे. या ७१.२० गुंठे जमिनीचाही मोठा भाग रिंगरोड प्रकल्पात जाणार आहे. त्यामुळे जमीन मालकास कोट्यवधींचा मोबदला मिळणार आहे.
पाथर्डी आणि गौळाणे येथील मिळून १०२ गुंठे जमीन नाशिक रिंगरोड प्रकल्पात जाणार आहे. रिंगरोडच्या संभाव्य मार्गापासून काही मीटर अंतरात खरात कुटुंबियांच्या नावावर १० ठिकाणी शेतजमीन आणि १२ ठिकाणी भूखंड असल्याचे सांगितले जाते. गौळाणे परिसरातील जमिनीच्या बदल्यात अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरात यांना सुमारे ८२ लाख ८३ हजार रुपयांचा मोबदला मिळण्याची शक्यता आहे. तर पाथर्डी येथील जमिनीपोटी तृप्तवाला खरात आणि सृष्टी खरात यांना १ कोटी ८२ लाख रुपये मिळणे शक्य आहे.
नाशिक रिगरोड प्रकल्पात अल्प मोबदला मिळत असल्याने काही शेतकरी, जमीन मालकांमध्ये नाराजी असताना हा रिंगरोड भोंदू अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांना मालामाल करण्याची चिन्हे दिसत आहेत.
