नाशिक – २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या अनेक प्रकल्पांपैकी नाशिक रिंगरोड (परिक्रमा मार्ग) हा एक आहे. सिंहस्थात कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेेश्वरमध्ये येण्याचा अंदाज आहे. या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी, गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी नाशिक रिंगरोड प्रमुख भूमिका बजावू शकतो. परंतु, नाशिक रिंगरोड जाहीर झाल्यापासून या प्रकल्पाच्या मार्गात सातत्याने वेगवेगळे अडथळे येत आहेत. परंतु, आता रिंगरोडच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होण्यास सुरुवात झाली असून मे महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

नाशिक शहर परिसरातील २५ गावांमधून रिंगरोड जाणार असून तो ६६.१५ किलोमीटरचा असेल. या प्रस्तावित रिंगरोडसाठी ३६६ हेक्टर म्हणजे ९१५ एकर क्षेत्र जमीन लागणार आहे. प्रस्तावित ६६.१५ किलोमीटरपैकी ५० किलोमीटर क्षेत्र हे खासगी जमीन मालकांचे आहे. त्यामुळे या जमीन खरेदीचे मोठे संकट उभे राहिले होते. त्यापैकी बऱ्याच अडचणी आता दूर होत आहेत. याशिवाय १६.१५ किलोमीटर क्षेेत्राची जमीन सरकारी आहे. त्यामुळे या जमीन खरेदीची तशी तशी आवश्यकताही राहणार नाही. खासगी जमीन मालकांनी जमिनीच्या बदल्यात मिळणारा मोबदला, लावण्यात येणारे निकष यावर आक्षेप घेतला आहे. काही ठिकाणी बागायती जमीन रिंगरोडसाठी जाणार असल्याने मार्ग बदलावा किंवा अधिक मोबदला मिळावा, अशी जमीन मालकांची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी, रिंगरोडसाठी ५० टक्के क्षेत्र संपादन होताच प्रत्यक्ष कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता प्रत्यक्ष खरेदीच्या प्रक्रियेसाठी ३१ मार्चअखेरपर्यंत दरांची निश्चिती होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे संमती दिलेल्या जमीन मालकांकडून जमिनीची थेट खरेदी करण्यात येणार आहे.

एप्रिल अखेरपर्यंत प्रत्यक्ष कामांच्या निविदा जाहीर झाल्यावर लगेचच प्रत्यक्ष कामालाही सुुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) आणि महसूल विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, महसूल, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख, लेखा विभागांच्या समितीव्दारे कमाला वेग देण्यात आला आहे. रिंगरोड प्रकल्प सरकारी असल्याने जमीन मालकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या खरेदी खतावर आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) माफ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात आहे. सध्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे केली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक अलिकडेच झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीला आणि नाशिक महानगर पालिकेला पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिलेत कुंभमेळ्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी इतर कामांसह रिंग रोडच्या कामाचा आढावा घेतला होता.