नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रस्तावित नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोड प्रकल्प हा केवळ बिल्डर आणि या भागात जमिनी खरेदी करणारे आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या जागांना भाव मिळावे म्हणून साकारला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यातील बड्या अधिकाऱ्यांनी रिंग रोड परिसरात ४० ते ५० एकर जमीन घेतली आहे. बिल्डर व बड्या अधिकाऱ्यांचे भले करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कमी दरात ओरबाडल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी ६६ किलोमीटरच्या परिक्रमा मार्ग अर्थात नाशिक रिंग रोडला मान्यता देण्यात आली आहे. २५ गावांमधून जाणाऱ्या या मार्गासाठी ३६५ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे संरेखन, भूसंपादनासाठीचे दर आणि अन्य विषयांवरून प्रकल्पाला विरोध होत आहे. या अनुषंगाने रामकुंड परिसरात मागील काही दिवसांपासून बाधित शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाशिक रिंग रोड प्रकल्पामागे बिल्डर आणि राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या जमिनींना सोन्याचा भाव मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. या प्रश्नी महिनाभरापूर्वी आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांचा विरोध असताना सकाळी घरात शिरून पवन दत्ता नामक आयएएस अधिकाऱ्याने दंडूका घेऊन दहशत निर्माण केली. या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीही चर्चा झाली होती. सरकार एकिकडे ५० हजाराची कर्जमाफी करते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेत असल्याचा आरोप खा. राऊत यांनी केला.
आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची ५० एकर जमीन
नाशिक रिंग रोड प्रकल्पात बिल्डरांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत. या भागात आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केलेली आहे. त्यांच्या जमिनींना भाव मिळावा असे रिंग रोडचे नियोजन आहे. राज्यातील बड्या अधिकाऱ्यांनी ४० ते ५० एकर जमिनी घेतल्या आहेत. आपल्याकडे सगळे पुरावे असून सातबारा उताऱ्यासह नावं वाचली तर मोठा भूकंप होईल, असे खा. संजय राऊत यांनी सूचित केले.
संबंधित अधिकाऱ्यांच्या नावांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांना दिली जाईल. सरकार संबंधितांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेत आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. कमी दरात शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडून घेतल्या जात आहे. हे शेतकऱ्यांचे राज्य आहे. लाडक्या बहिणी आंदोलनात सहभागी आहेत. मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी हस्तक्षेप न केल्यास शेतकऱ्यांच्या सोबतीने संबंधित अधिकाऱ्यांच्या घरात शिरून शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा खा. राऊत यांनी दिला.
