नाशिक – आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात रिंगरोड प्रकल्पाच्या प्रमुख पाच टप्प्यात तब्बल ५६९७ झाडे बाधीत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) राष्ट्रीय हरित लवादासमोर सादर केलेल्या अर्जातून उघड झाली आहे. तात्पुरत्या स्थगितीमुळे महापालिकेने आमच्या वृक्षतोड व पुनर्रोपणासंदर्भातील अर्जांवर निर्णय घेण्यास नकार दिल्याने रिंगरोडचे काम ठप्प झाले. त्यामुळे वृक्षतोडीसंदर्भात दाखल याचिकेत आम्हालाही सहभागी करावे आणि मनपा वृक्ष प्राधिकरणाला आमच्या अर्जांवर निर्णय घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी एमएसआयडीसीने केली आहे.
कुंभमेळ्यातील प्रस्तावित विविध कामांसाठी चाललेल्या वृक्षतोडीवरून पर्यावरणप्रेमी आणि नाशिक महापालिका यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. तपोवनातील प्रस्तावित दोन हजार झाडांचा मुद्दा गाजत असताना शहरात इतरत्र मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचा वृक्षप्रेमींचा आक्षेप आहे. शुक्रवारी हरित लवादातील (एनजीटी) सुनावणीत विविध भागात झालेल्या वृक्षतोडीबाबत वृक्षप्रेमींनी घेतलेल्या आक्षेपांवर महापालिकेने शपथपत्राद्वारे आपले म्हणणे सादर केले. यावेळी हस्तक्षेप अर्जाद्वारे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) या याचिकेत सहभागी करून घेण्याची मागणी केली. नाशिक रिंगरोड प्रकल्पातील बाधित झाडांसाठी प्रत्येक झाडाची जात, वय, आकार व स्थान यासह नियमानुसार अर्ज केले. नुकसान भरपाई म्हणून नवीन झाडे लावण्याचे हमीपत्र देण्याची आमची तयारी आहे. परंतु, एनजीटीच्या अंतरिम आदेशामुळे महापालिकेने अर्जांवर निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली असून प्रकल्पाचे काम थांबल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
दरम्यान, यावर पुढील सुनावणी एक सप्टेंबर रोजी होणार आहे. वृक्षतोडीवरील स्थगिती तोपर्यंत कायम राहणार असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील श्रीराम पिंगळे आणि ॲड. विकास अग्रवाल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
‘वेळेत काम न झाल्यास मोठे नुकसान’
‘विशिष्ट दिलासा कायदा १९६३’ तील कलमान्वये कोणत्याही पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या कामात अडथळा किंवा उशीर होईल, असा कोणताही मनाईहुकूम देऊ नये, कुंभमेळ्याची तारीख निश्चित असल्याने नाशिक रिंगरोडचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होईल. प्रतिवादी म्हणून आम्हाला समाविष्ट करावे, सात एप्रिल आणि १४ ऑगस्टच्या आदेशात एनजीटीने सुधारणा करून स्थगिती नाशिक रिंगरोड प्रकल्पाच्या वृक्षतोड व पुनर्रोपण अर्जावर लागू होणार नाही हे स्पष्ट करावे. आणि नाशिक महापालिका वृक्ष प्राधिकरणास या अर्जांवर कायद्यानुसार व गुणवत्तेवर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
रिंगरोड प्रकल्पातील बाधित झाडे
६५.७ किलोमीटरच्या नाशिक रिंगरोड प्रकल्पाच्या सातपैकी पाच मुख्य टप्प्यातील बाधित झाडांची आकडेवारी एमएसआयडीसीने हरित लवादासमोर अर्जातून मांडली आहे. यामध्ये मखमलाबाद आडगाव, वरवंडी, मनेगाव, गांगडवाडी या (टप्पा दोन – ६७९ झाडे), आडगाव, विंचूरगवळी, माडसांगवी (टप्पा चार – ८४७ झाडे), पंचक, देवळाली, विहितगाव, भगूर, नाशिक (टप्पा पाच – १३९३), विहितगाव, वडनेर दुमाला, पाथर्डी, पिंपळगाव खांब, शेवगेदारणा (टप्पा सहा – १४०४), राजुरबहुला, सारुळ आणि पळसे (टप्पा सात – १२८४) अशा एकूण ५६९७ झाडांचा समावेश आहे.
