नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात हाती घेण्यात आलेल्या विविध रस्त्यांच्या कामांमुळे अंतर्गत मार्गांवरील वाहतुकीत मोठे फेरबदल होत आहेत. द्वारका चौक अवजड वाहनांसाठी बंद केल्यानंतर, आता औद्योगिक वसाहतीतील गरवारे पॉईंट ते एक्स्लो पॉईंट दरम्यानच्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. रस्त्यांची कामे पूर्णत्वास जाईपर्यंत पुढील काही महिने नाशिककरांसह वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागणार असून धुळीचाही सामना करावा लागत आहे.

​मागील काही महिने खड्डेमय रस्त्यांमुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. डांबरी रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडतात व त्यांची वारंवार दुरुस्ती करावी लागते. हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी कुंभमेळ्यात प्रमुख रस्ते डांबरीऐवजी काँक्रीटचे करण्यावर भर देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वीच म्हटले आहे.

कुंभमेळ्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी बाकी असून पावसाळ्यात ही कामे थंडावतील, त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कामांना गती दिली जात आहे. परिणामी संबंधित मार्गांवरील वाहतुकीत फेरबदल होत असून वाहनधारकांना पर्यायी मार्गांवरून मार्गक्रमण करावे लागत आहे. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांविषयी उद्योजकांकडून अनेकदा तक्रारी करत आंदोलनात्मक पवित्रा घेतला गेला होता. महापालिकेने आता अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे पॉईंट ते एक्स्लो पॉईंट या प्रमुख रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू केले आहे.

​मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून अंबड, सातपूर औद्योगिक वसाहत तसेच नाशिक शहरात न येता त्र्यंबकेश्वर, गंगापूर वा अन्यत्र ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी अंबड लिंक रस्त्याला संलग्न असणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. अवजड वाहनांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. या मार्गाच्या काँक्रीटीकरणामुळे गरवारे टी पॉईंटकडून एक्स्लो पॉईंटकडे जाणारा मार्ग बंद केला जात आहे. वाहनधारकांना आता क्रॉम्प्टन कंपनी, ब्लू क्रॉस कंपनी, ग्लॅक्सो टी पॉईंट, सिमेन्स कंपनी आणि नाशिक क्लस्टर मार्गे प्रवास करावा लागेल. एक्स्लो पॉईंटकडून गरवारे टी पॉईंटकडे येणारी वाहतूक एक्स्लो पॉईंट येथून डावीकडे वळून स्टेपिंग टी पॉईंट, टेक्नोफोर्स कंपनी, हॉटेल सम्राट, आकाश उद्योग टी पॉईंट, संजीवन बोटॅनिकल टी पॉईंट मार्गे पुढे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाकडे जाईल. शुक्रवारपासून लागू झालेले वाहतुकीचे हे निर्बंध पुढील तीन महिने म्हणजेच २९ एप्रिल २०२६ पर्यंत राहणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी म्हटले आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून सवलत देण्यात आली आहे.