नाशिक – आगामी ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’ च्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने आता कंबर कसली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी भुसावळ ते नाशिक रोड दरम्यान व्यापक ‘रियर विंडो’ निरीक्षण करून कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या दौऱ्यामुळे रेल्वे यंत्रणा कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुंभमेळ्यादरम्यान भाविकांची होणारी अफाट गर्दी लक्षात घेता, मनमाड स्थानकावर प्रवाशांना थांबण्यासाठी प्रस्तावित ‘होल्डिंग एरिया’ आणि आरपीएफ चौकीच्या बांधकामाची अग्रवाल यांनी बारकाईने पाहणी केली. भाविकांची सुरक्षा आणि सुविधांमध्ये कोणतीही तडजोड न करता ही कामे विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी क्रू लॉबी आणि रेल्वे हेल्थ युनिटलाही भेट देऊन कर्मचारी व प्रवाशांच्या सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
निफाड, कसबेसुकेणे आणि खेरवाडी यांसारख्या छोट्या परंतु तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थानकांवरही कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांचा विस्तार केला जात आहे. या स्थानकांवर प्रवाशांची चढ-उतार सुलभ व्हावी आणि गर्दीचे नियंत्रण करताना कोणतीही चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरू असलेल्या कामांची गती वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या. नाशिक रोड आणि देवळाली स्थानकावरही प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, फलाटांचे विस्तारीकरण व पादचारी पुलांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत वरिष्ठ शाखा अधिकारी या दौऱ्यात सहभागी होते. सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे, असे सांगत अग्रवाल यांनी रेल्वेच्या संपूर्ण टीमला सतर्क राहण्याचे आदेश दिले. रेल्वे प्रशासनाच्या या नियोजनामुळे आगामी कुंभमेळा भाविकांसाठी अधिक सुरक्षित आणि सुखकर होण्याची चिन्हे आहेत.
सुरक्षेवर विशेष भर
रेल्वे प्रवासातील सुरक्षितता वाढवण्यासाठी निफाड-नाशिक दरम्यान उभारण्यात येत असलेल्या ‘ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग हट’च्या कामांची डीआरएमनी विशेष दखल घेतली. कुंभमेळ्यात गाड्यांची वारंवारता लक्षणीयरीत्या वाढणार असल्याने ही आधुनिक सिग्नल यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. यासोबतच नाशिक परिसरातील गर्दी नियंत्रण, सीसीटीव्ही जाळे आणि आरपीएफ ट्रेनिंग सेंटरमधील प्रशिक्षण व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली.
पायाभूत सुविधांचा विकास
कुंभमेळ्यानिमित्त व्यापक कामे हाती घेण्यात आली आहे. देवळाली रेल्वे स्थानकात स्थिरीकरण, देखभाल दुरुस्ती व वाहनतळासाठी प्रत्येकी दोन रेल्वे मार्गिका तयार करण्यात येतील. नाशिकरोड रेल्वे स्थानकात सध्याच्या २२ बोगींऐवजी २४ बोगी असणाऱ्या रेल्वेगाडीच्या वाहनतळासाठी दोन मार्गिका विकसित केल्या जातील. फलाट क्रमांक एकचाही विस्तार होणार आहे. या विकासामुळे वेगवेगळ्या दिशांना रेल्वेगाडी थांबविणे (शेवटचे स्थानक) आणि नव्याने तिचा प्रवास सुरू करणे (उगमस्थान) म्हणून करण्यास मदत होणार आहे.
