नाशिक : दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी भुसावळ विभागातील नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. येत्या १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ही बंदी लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी स्थानकावर येणाऱ्या नागरिकांना या कालावधीत प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध होणार नाही.

दिवाळी आणि छठ सणानिमित्त मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे प्रशासनाने यानिमित्त विशेष रेल्वे सोडल्या आहेत. या काळात प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढते. नाशिक रोड स्थानकावरही या काळात प्रवाशांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. अनेकदा प्रवाशांसोबत येणारे नातेवाईक आणि मित्रमंडळी प्लॅटफॉर्मवर गर्दी करतात. परिणामी प्रवाशांची ये-जा, फलाटांवरील हालचाल आणि रेल्वेच्या दैनंदिन व्यवस्थापनावर ताण निर्माण होतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्येष्ठ नागरिकांना सवलत

१ नोव्हेंबरपासून लागू होणारे हे निर्बंध १५ नोव्हेंबरपर्यंत कायम राहतील. मात्र, प्रवाशांच्या सोयीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने काही घटकांना या निर्बंधांतून सवलत दिली आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच वैद्यकीय कारणांमुळे स्थानकावर येणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना आवश्यकतेनुसार प्लॅटफॉर्मवर जाण्याची सुविधा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाचे आवाहन

१ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी शक्यतो स्थानकाबाहेरच थांबावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवाशांची सुरक्षितता, फलाटांवरील गर्दीचे नियोजन आणि स्थानक परिसरातील वाहतुकीची सुरळीतता राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांनी निर्बंधांची नोंद घेऊन त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.