नाशिक – मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राबविण्यात येणारी शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया दरवर्षी वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत असते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला होणारा विलंब सर्वश्रृत आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया पालकांसाठी अडचणीच्या ठरणाऱ्या एका अटीमुळे गाजत आहे. मुलांच्या भविष्यासाठी पालकांना अडचणीची अट दूर करावी किंवा अट शिथील करावी, यासाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या प्रकरणात उडी घेतली आहे.
राज्यात खासगी आणि अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांसाठी मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यातंर्गत राखीव आहेत. या कायद्यांचा अनेक विद्यार्थी आणि पालकांना याआधी लाभ झाला आहे. मुलांच्या मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ मधील कलम १२(१) (क) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी शासनाकडून या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी असलेल्या एका अटीत बदल केला आहे.
आणि हा बदल पालकांसाठी त्रासदायक झाला आहे. या नवीन अटीनुसार विद्यार्थ्यांचे घर शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्वी ही अट तीन किलोमीटर अंतराची होती, ज्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना अर्ज करता येत होता, मात्र, आता अंतर कमी केल्यामुळे मोजक्याच विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अधिक नुकसान होणार आहे.
ही अट मुलांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्कावर मर्यादा आणणारी आहे. कायद्यात एक किंवा तीन किलोमीटर अशी कोणतीही कठोर अंतर मर्यादा नमूद केलेली नाही. त्यामुळे अंतराच्या आधारावर विद्यार्थ्यांना अपात्र ठरवणे हा कायद्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारा निर्णय आहे. शासनाने नव्याने लागू केलेली एक किलोमीटर अंतराची अट रद्द करून पूर्वीप्रमाणे तीन किलोमीटर अंतर ही अट करण्यात यावी.
तसेच कोणतीही खासीगी शाळा केवळ अंतराच्या निकषावरून वगळली जाणार नाही, याबाबत स्पष्ट आदेश द्यावेत, नाशिक जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित व अनुदानित शाळांना आरटीई अंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक करावे आणि आरटीई पोर्टलवर नोंदणी टाळणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने शिक्षण उपसंचालकसंजयकुमार राठोड यांच्याकडे करण्यात आली असून शासनाकडे याबाबबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष चेतन कासव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहित पाटील, देवळा तालुका अध्यक्ष तेजस आहिरे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश पगार, जिल्हा सरचिटणीस गौरव जाधव, शुभम महाजन, जिल्हा सचिव धनंजय गोसावी, जिल्हा संघटक आकिब खान, प्रतीक नागरे, सौरभ आहेर, हेमंत मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
