महिलांवरील अत्याचाराविरोधात आता ‘दामिनी पथक’ *  ग्रामीण पोलिसांचे ‘से नो’ अभियान

महिला सक्षमीकरण, आत्मनिर्भरता आणि सुरक्षितता या त्रिसूत्रीला केंद्रस्थानी ठेवत जिल्हा ग्रामीण पोलिसांच्यावतीने मंगळवारी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत स्त्रीशक्तीचा अनोखा जागर ‘सखी मेळावा आणि ‘से नो’ अभियानाच्या माध्यमातून करण्यात आला. दिवसागणिक वाढणाऱ्या अत्याचाराविरुद्ध पोलिसांनी दामिनी पथक तैनात केले असून मान्यवरांच्या हस्ते या पथकाच्या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.

जिल्हा ग्रामीण पोलिसांच्यावतीने महिलांवरील वाढते कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण, लैंगिक अत्याचाराच्या घटना, ऑनलाइन माध्यमातून होणारी त्यांची फसवणूक, नवमाध्यमांचा होणारा गैरवापर यासह अन्य काही बाबी केंद्रस्थानी ठेवत गुन्हेगारीचे बदलत जाणारे स्वरूप, त्यासाठी महिलांनी बाळगण्याची दक्षता यावर ‘सखी मेळावा’ उपक्रमाद्वारे प्रकाशझोत टाकण्यात आला.

मेळाव्यात विविध चित्रफितीतून महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात पुढे कसे यावे, याची माहिती देताना तेजस्विनी अभियान, पोलीस सखी, मदतवाहिनी क्रमांक, महिला सुरक्षा कवच योजना, दामिनी पथक यांसह विविध उपक्रमांची माहिती दिली. अलीकडच्या काळात नवमाध्यमाद्वारे महिलांना लक्ष्य केले जाते. त्यांच्या बेसावधतेचा फायदा घेत अश्लील छायाचित्रे, चित्रफीत तयार करण्याचे काम होत आहे. त्या आधारे धाक दाखवत वाम मार्गाला लावणे किंवा त्यांच्याकडून पैसे वसूल करणे असे उद्योग वाढीस लागल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

महापौर रंजना भानसी यांनी आधुनिक तंत्राच्या अतिरेकाने लहान वयातच मुलांपर्यंत नको ती माहिती पोहोचत असल्याचे सांगितले. आपली मुले व मुली काय करतात याकडे पालकांचे लक्ष असणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीचे खापर पोलिसांवर फोडता येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. अश्विनी बोरस्ते यांनी महिलांनी आपल्यावरील अत्याचाराविरोधात पुढे यावे. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बचत गट, लघुउद्योगाच्या माध्यमातून प्रयत्न होतील असे सांगितले. दरम्यान, कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नींचा सत्कार करण्यात आला. तसेच दामिनी पथकाच्या वाहनाचे हिरवा झेंडा दाखवत लोकार्पण करण्यात आले.

दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, डॉ. निवेदिता पवार, अश्विनी बोरस्ते, अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते. मेळाव्यास जिल्ह्य़ातून दोन ते अडीच हजार महिला उपस्थित होत्या.

ग्रामीण भागांत ‘सखी पोलीस’

महिला सक्षमीकरणाचे वारे सर्वत्र वाहत असले तरी ग्रामीण भागात अद्याप महिलांना त्यांच्या हक्कांची व अधिकाराची जाणीव नाही. अन्यायाविरोधात आता दाद मागण्याची वेळ आल्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी सांगितले. यासाठी ग्रामीण पोलिसांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. मात्र ते तळागाळापर्यंत पोहोचले नसल्याने मेळाव्यातून ‘सखी पोलीस’ ही संकल्पना मांडण्यात आली. आपल्यातील एक महिला किंवा आपण स्वत: या अत्याचाराविरोधात उभी राहील यासाठी त्यांनी निर्भय होणे गरजेचे आहे. महिलांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले. पालघर येथील सायबर गुन्हे शाखेचे कदम यांनी महिला वर्गाची ऑनलाइनमध्ये होणाऱ्या फसवणुकीकडे लक्ष वेधले. आपली माहिती तिऱ्हाईत व्यक्तीला देताना सावधानता बाळगावी, असे त्यांनी सूचित केले.

मदतीसाठी ‘१०९१’ वर संपर्क साधा

महिलांनी या स्थितीला तोंड देण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ‘नाही’ म्हणायला शिका असे आवाहन ‘से नो’ अभियानाच्या माध्यमातून करण्यात आले. दामिनी पथकाच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील शाळा, महाविद्यालये यासह गर्दीच्या ठिकाणी महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनीची काढण्यात येणारी छेड, तिला दिल्या जाणाऱ्या त्रासाबाबत कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी १०९१ मदतवाहिनीवर संपर्क साधल्यावर तात्काळ मदत पोहचेल, असा दावा पोलिसांनी केला.