करोनाच्या संकटकालानंतर नाशिकमध्ये साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येत आहे. मार्चमध्ये होणारं हे संमेलन करोनामुळे स्थगित करण्यात आलं होतं. ते आता या आठवड्यात होत आहे. मात्र, एकीकडे नाशिकमध्ये ९४व्या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे राज्यात अवतरलेल्या अवकाळी पावसामुळे सगळ्यांच्याच पोटात गोळा आला आहे. साहित्य संमेलनातील अनेक कार्यक्रम हे खुल्या प्रांगणात होतात. त्यामुळे नाशिकमध्ये जर या काळात पाऊस आला, तर संमेलनाचं काय होणार? असा प्रश्न साहित्य रसिकांना पडला आहे. मात्र, पावसाची संभाव्य शक्यता लक्षात घेता साहित्य संमेलन स्थळी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जलरोधक मुख्य मंडप नाशिकमध्ये सध्या तुरळक ठिकाणी पाऊस आहे. मात्र, कधीही पाऊस येऊ शकतो, हे गृहीत धरून नाशिकमध्ये तयारी करण्यात आली आहे. संमेलनाचा मुख्य मंडप हा आग आणि जलरोधक आहे. त्यामुळे अवकाळी पावसानं हजेरी लावलीच, तरी मंडपातील कार्यक्रमांना कोणताही अडथळा येणार नसल्याची खातरजमा करण्यात आली आहे. बंदिस्त सभागृह दुसरीकडे साहित्य संमेलनाच्या ठिकाणी चार बंदिस्त सभागृह आहेत. संमेलनादरम्यानचे अनेक कार्यक्रम या बंदिस्त सभागृहांमध्येच होणार आहेत. हे पाहाता अवकाळी पावसाचा या कार्यक्रमांवर काही परिणाम होण्याची शक्यता फारच कमी असल्याचं बोललं जात आहे. या सभागृहांपर्यंत जाताना मात्र साहित्य रसिक भिजण्याची शक्यता लक्षात घेऊन आयोजक त्याबाबत काही वेगळी व्यवस्ता करण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, कोकणात पावसाची संततधार; ३ डिसेंबरपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार कोसळण्याची शक्यता खुल्या प्रांगणातील कार्यक्रमांचं काय? दरम्यान, मुख्य मंडप आणि बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांना अवकाळी पावसामुळे फारसा फटका बसणार नसला, तरी खुल्या प्रांगणात होणारे कार्यक्रम मात्र यामुळे प्रभावित होऊ शकतात. कवीकट्टा, गझल मंच, बालकुमार मेळावा असे कार्यक्रम हे खुल्या प्रांगणात हिरवळीवर होणार आहेत. त्यामुळे हे कार्यक्रम सुरू असताना पावसानं हजेरी लावली, तर त्यात मोठा अडथळा येईल. या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मंडप समितीची तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे. उपस्थिती घटणार? राज्याच्या इतर भागांप्रमाणेच नाशिकमध्ये देखील अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यास साहित्य संमेलनासाठीची उपस्थिती कमी होऊ शकते. यावरही उपाय म्हणून आयोजकांनी शहरातील विविध भागांमधून साहित्यप्रेमींना संमेलनस्थळी आणण्यासाठी ३०० बसचा ताफा सज्ज ठेवला आहे. शहराच्या सर्व भागांमधून संमेलनस्थळी मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.