नाशिक – कठोर मेहनत, सातत्य आणि स्वत:वर ठाम विश्वास, या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश नक्कीच मिळते. या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवत अभ्यास केला. यामुळे हे यश मिळाले. यशासाठी कुठलाही जवळचा मार्ग नसतो, अशी प्रतिक्रिया द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत देशात सर्वप्रथम आलेल्या येथील साक्षी जैन हिने दिली.
मे महिन्यातआयसीएआयतर्फे सीए फाउंडेशन परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत ४०० पैकी ३७१ गुण मिळवून ९२.७५ टक्क्यांसह साक्षी देशात सर्वप्रथम आली. सीए होणे आपले स्वप्न असून फाऊंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्याने पहिला टप्पा पार केल्याचे साक्षीने सांगितले. साक्षीचा आतेभाऊ सीए असून नातेवाईकांपैकी अन्य दोन जण सीएची तयारी करीत आहेत. या परीक्षेसाठी घरातील सर्वांनी पाठिंबा दिला. वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे साक्षीने सांगितले. अकरावीत महाविद्यालयात दुसरी तर बारावीत प्रथम आलेल्या साक्षीने शिकवणी वर्गात मिळालेले मार्गदर्शन आणि दहा ते बारा तास अभ्यास यामुळे हे यश मिळाल्याचे नमूद केले. कठोर मेहनतीला पर्याय नसतो. मेहनत असली तर यश हमखास मिळते. कारण त्या ठिकाणी कुठलेही आरक्षण, सवलत वा अन्य पर्याय नसतात, अशी भूमिका तिने मांडली.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हे साक्षीचे मूळ गाव. पाचोरा येथे तिचे दहावी पर्यंतचे शिक्षण झाले. घरी आई, वडील, भाऊ, बहीण ,आजी, आजोबा, काका, काकु असे एकत्र कुटूंब आहे. वडील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य व्यापारी आहेत. व्यावसायिक पार्श्वभूमीमुळे दहावीत असतांनाच साक्षीने सीए होण्याचे ठरवले. त्यासाठी ती नाशिकला आली. नाशिकच्या जैन बोर्डिंगमध्ये राहून तिने भि.य.क्ष. वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला. नियमित अभ्यासासह सीए फाऊंडेशनची तयारी केली.
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अर्थात आयसीएआयकडून मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिक शहरात उत्कर्ष वाणी ४०० पैकी ३४३ गुण मिळवून दुसरा आणि अनन्या माहेश्वरी ४०० पैकी ३४० गुण मिळवून तिसरी आली. नाशिक शहरातून ९८७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
