नाशिक : आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांना अखंड, तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली आहे.

पालखी मार्गावर आरोग्य उपचार केंद्रे, १०८ व १०२ रुग्णवाहिका, कार्डियाक रुग्णवाहिका, फिरती वैद्यकीय पथके, आरोग्यदूत, शुद्ध पिण्याचे पाणी, रोगप्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती कार्यक्रमांचे व्यापक नियोजन करण्यात आले असून, वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजनावर भर दिला आहे. सोमवारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या समन्वयातून पालखी मार्गावरील सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पालखी मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य उपचार केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांवर प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी १०८ व १०२ रुग्णवाहिका सेवेसह एक अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. हृदयविकारासारख्या गंभीर आजारांवरील रुग्णांसाठी ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. तसेच, आवश्यकतेनुसार ईसीजी तपासणीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे, यासाठी पालखी मार्गावरील विविध पाणी स्रोतांची तपासणी करून त्यांचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी विशेष आरोग्यदूतांची नियुक्ती करण्यात आली असून, ते नियमितपणे पाण्याचे नमुने तपासणार आहेत. संसर्गजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी वेळोवेळी धूर फवारणी, कीटकनाशक फवारणी तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

पालखी मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे आणि इतर आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक औषधे, जीवनरक्षक औषधांचा साठा, वैद्यकीय साहित्य तसेच इतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक दर्शविणारे माहिती फलक विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत.

दिंडीसोबत फिरते आरोग्य पथक

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने २० आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष फिरते पथक तयार केले असून, हे पथक दिंडीसोबत प्रवास करत वारकऱ्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरविणार आहे. पंढरपूरला जाताना तसेच परतीच्या प्रवासातही हे पथक वारकऱ्यांच्या सेवेत कायम कार्यरत राहणार आहे. दिंडीसोबत २ वैद्यकीय अधिकारी, २ समुदाय आरोग्य अधिकारी, १२ आरोग्य कर्मचारी, २ वाहनचालक आणि २ रुग्णवाहिका सतत उपलब्ध राहणार आहेत. यापैकी एक अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मार्गदर्शनासाठी आरोग्य दूत

नियुक्त करण्यात आलेले आरोग्यदूत विशिष्ट गणवेशात कार्यरत राहून वारकऱ्यांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि तातडीची आरोग्य मदत उपलब्ध करून देतील. या सेवेसाठी जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.