नाशिक – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे सटाणा ते नाशिक मार्गावर अत्याधुनिक, वातानुकूलित ‘शिवाई’ ई-बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा विनावाहक आणि विनाथांबा असणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य परिवहन महामंडळ पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासासाठी प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने महामंडळाच्या वतीने ‘हरित प्रवास, स्वच्छ भविष्य…’ हे ब्रीद घेऊन ई-बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत त्र्यंबकेश्वर, कळवण, बोरिवली, मालेगाव, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव आणि शिर्डी या परिसरांत ७५ ई-बस सुरू आहेत. पुढील टप्प्यात महामंडळाच्या वतीने सटाणा ते नाशिक मार्गावर वातानुकूलित ‘शिवाई’ ई-बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
या मार्गावर दहा ई-बस धावणार आहेत. सटाणा ते नाशिक मार्गावर सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दर अर्ध्या ते एक तासाच्या अंतराने बस सुटतील. नाशिक विभागातील प्रवाशांनी या नवीन, आरामदायी आणि पर्यावरणपूरक ई-बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
सटाणा ते नाशिक बसच्या वेळा
६.००, ६.३०, ७.००, ७.३०, ८.००, ८.३०, ९.००, ९.३०, १०.००, १०.३०, १२.३०, १३.००, १३.३०, १४.००, १४.३०, १५.००, १५.३०, १६.००, १६.३० आणि १७.००.
नाशिक ते सटाणा बसच्या वेळा
सकाळी ८.३० ते रात्री ७.३० या कालावधीत बस उपलब्ध असतील. ८.३०, ९.००, ९.३०, १०.००, १०.३०, ११.००, ११.३०, १२.००, १२.३०, १३.००, १५.००, १५.३०, १६.००, १६.३०, १७.००, १७.३०, १८.००, १८.३०, १९.०० आणि १९.३०.
ई-बसची प्रमुख वैशिष्ट्ये
पूर्णतः वातानुकूलित ई-बस असल्याने प्रवाशांना थंड आणि आल्हाददायक वातावरणात प्रवास करता येईल. विनावाहक आणि विनाथांबा प्रवास असल्याने जलद आणि विनाअडथळा प्रवासाची सोय होईल. आरामदायी पुशबॅक आसने असल्याने दूरच्या प्रवासासाठी ही बस सोयीची ठरणार आहे. प्रत्येक आसनाजवळ मोबाइल चार्जिंग पोर्ट आणि रीडिंग लाइटची सुविधा आहे. पर्यावरणपूरक प्रवासासाठी हरित ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे.
