नाशिक – प्रदीर्घ उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षांचा आरंभ शहरासह जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात झाला. पुस्तके, वह्या, दप्तर असे सर्वकाही नवे असल्याने नव्याची नवलाई मिरवत चिमुकले शाळेची पायरी चढले. उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने याचा काही विद्यार्थ्यांना त्रास झाला, गुलाबपुष्प, खाऊ, औक्षण, नव्या-जुन्या मित्रांची साथ, आई-वडिलांचा काही क्षणांसाठी सुटलेला हात..यामुळे लागलेली हुरहु, ओळखीचे कोणीच नाही म्हणून शुन्यात हरवलेले चेहरे, अशा संमिश्र वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस पार पडला. अनेक ठिकाणी प्रवेशोत्सवासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वेध लागतात ते शाळेच्या पहिल्या दिवसाचे. यंदा प्रवेशोत्सवासाठी प्रशासकीय पातळीवर शिक्षण विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले. यामध्ये लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांना प्रवेशोत्सव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा आकर्षक पध्दतीने सजविण्यात आली. ठिकठिकाणी फुगे लावण्यात आले. रंगीत पताका तसेच कार्टुन्सचे कटआऊट यासह फुलांची आरास करण्यात आली. विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. त्यांना पेन, रंग असे शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. काही ठिकाणी शाळेत पहिल्यांदा पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांची पाऊले रंगीत पाण्यात भिजवून कोऱ्या कागदावर ठेवत पाऊले उमटविण्यात आली. ग्रामीण भागात बैलगाडी, ट्रॅक्टरवर विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. लेझीम, ताशाच्या गजरात मुले शाळेत आली. दुसरीकडे, शिक्षण विभागाच्या आवाहनानुसार शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये दाखल झाले होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत शिवाजी नगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालयात प्रवेशोत्सव झाला. गुलाबी खोली या उपक्रमाचे उद्घाटनही झाले. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शाळेतील सर्व वर्गांना भेट देऊन शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. पेठ तालुक्यातील दोनवाडे येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. सजवलेल्या ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. पुरूषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये वर्षारंभ उपासनाने प्रवेशोत्सवास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव तसेच औक्षण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीनेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, शाळा पातळीवर प्रवेशोत्सवाची धमाल असतांना यामध्ये रंग भरले ते चिमुकल्यांनी. आई-बाबा किंवा घरातील अन्य सदस्यांबरोबर पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवणारे चेहरे या गर्दीत भांबावले. एवढ्या मोठ्या इमारतीत, खोलील आपल्याबरोबर घरातील कोणी नाही हे पाहून अनेकांनी वर्गात पाऊल ठेवताच टाहो फोडला. काहींनी आई -बाबांचा हात घट्ट पकडून ठेवला. ही मिठी सोडवतांना पालक आणि शिक्षक यांच्या नाकी नऊ आले. काहींचा त्रागा पाहता हात पाय पकडून उचलून त्यांना वर्गात बसविण्यात आले. विद्यार्थ्यांचा हा धिंगाणा शिक्षक तसेच पालकांच्या संयमाची परीक्षा घेणारा ठरला.
काही शाळांमध्ये पुस्तके, गणवेश न पोहचल्याने गोंधळ
नव्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवसाच्या वातावरण निर्मितीसाठी शाळेतील प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी दमला. विद्यार्थ्यांची जमवाजमव, पुस्तके मिळविणे, प्रवेशाची तयारी, निमंत्रितांचे नखरे असे सारे काही सांभाळताना शिक्षक मेटाकुटीला आले. अनेक शाळांमध्ये शालेय विभागाकडून पहिली ते चौथीची पुस्तके पोहचली. परंतु, ती कमी प्रमाणात होती. काही ठिकाणी पुस्तके पोहचलीच नाहीत. गणवेशही बहुसंख्य शाळांमध्ये पोहचले नाहीत. इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावीच्या काही विषयांचा अभ्यासक्रम बदलला असल्याने ती पुस्तके आली नाहीत. यामुळे पूर्ण संच पोहचला नाही, असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मागणी नोंदविल्याप्रमाणे पुस्तके वितरीत केल्याचा दावा शिक्षण विभाग करत आहे.
