नाशिक : राज्यात बहुचर्चित असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सेवानिवृत्त वेतन अधीक्षक राजमोहन हरिप्रसाद शर्मा (५८) याला गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार यांच्या पथकाने अटक केली. पोलीस हवालदार राहुल जगजाप, पोलीस अंमलदार संदीप भुरे, राकेश राऊत आणि गुरु गांगुर्डे यांनी आंबेजोगाई (जिल्हा बीड) येथे आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
नाशिक विभागांतर्गत जळगाव येथील ११ शाळांमधील ९५ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना तसेच शालार्थ प्रस्तावांना वैयक्तिक मान्यता नसतानाही, मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीमध्ये नोंदी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या माध्यमातून वेतन आणि थकबाकीच्या स्वरूपात शासनाची १० कोटी ९ लाख ५३ हजार ६४९ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आतापर्यंत सुमारे १४५ आरोपी निष्पन्न झाले आहेत.
अटक करण्यात आलेले राजमोहन शर्मा हे जळगाव येथे वेतन अधीक्षक म्हणून कार्यरत असताना शालार्थ आयडीचा मसुदा अपलोड करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते. उपसंचालक कार्यालयाकडून मूळ शालार्थ मंजुरीचे आदेश प्राप्त झालेले नसतानाही, तसेच कार्यालयीन अभिलेखांची पडताळणी न करता, गुन्ह्यात नमूद केलेल्या ११ शाळांमधील ९५ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संगणकीय प्रणालीतील अभिलेखांची सत्यता तपासून न पाहता वेतन अदा करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अटक आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, नाशिकरोड यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक रितेश अहिरे, सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस हवालदार शिवाजी कुलकर्णी आणि संदीप बागल, तसेच पोलीस शिपाई योगेश पवार आणि वैभव खांडेकर हे तपास करीत आहेत.
