नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यातील कामांच्या तयारीला प्रशासनाकडून वेग देण्यात येत असताना त्याअनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांचीही चर्चा होत आहे. नाशिकरोड ते साईनगर शिर्डी हा दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्प त्यापैकीच एक. कित्येक दिवसांपासून या रेल्वेमार्ग प्रकल्पाची तयारी सुरु असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाकरिता भूसंपादन करण्यास जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत.
नाशिक हे देशातील महत्वपूर्ण शहर असल्याने या शहराची दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याअनुषंगाने रस्तेमार्गाप्रमाणेच हवाई आणि रेल्वेसेवेकडेही लक्ष देण्यात येत आहे. नाशिकहून मुंबईसाठी रेल्वेसेवा असली तरी नाशिक -पुणे रेल्वेसेवा नाङी. प्रस्तावित रेल्वेसेवा वादात सापडली आहे. नाशिक-पुणे रेल्वेसेवेचा मूळ मार्ग आधी सिन्नर, संगमनेर, राजगुरुनगरमार्गे निश्चित करण्यात आला होता. परंतु, त्यात बदल करुन तो शिर्डीमार्गे करण्यात आला. त्यामुळे मूळ मार्गानुसारच नाशिक-पुणे रेल्वेसेवा व्हावी, यासाठी ठिकठिकाणी आंदोलनेही झाली. सद्यस्थितीत या मार्गासंदर्भात कोणत्याच हालचाली नसताना नाशिकरोड ते साईनगर शिर्डी दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्प चर्चेत आहे.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन शाखेला यासंदर्भात मध्य रेल्वेकडून प्रस्ताव प्राप्त झाला होता. या मूळ प्रस्तावाच्या आधारे भूसंपादन कार्यवाहीस गती देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील ३४ गावांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे. नाशिक जिल्ह्याचे भूसंपादन समन्वय अधिकारी राजेंद्र वाघ यांच्या डिजिटल स्वाक्षरीने २५ मे रोजी भूसंपादनाचे आदेश जारी करण्यात आले. यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नाशिक आणि सिन्नर या दोन तालुक्यातील एकूण ३४ गावांमध्ये नाशिकरोड ते साईनगर शिर्डी या दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन केले जाणार आहे. त्याची जबाबदारी निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलीआहे.
भूसंपादन करण्यात येणाऱ्या गावांमध्ये सिन्नर तालुक्यातील २३ आणि नाशिक तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील सिन्नरसह खंबाळे, कुंदेवाडी, वडझिरे, दातली, मलढोण, पाथरे खुर्द, पांगरी खुर्द, मांजरे, फुलेनगर, ब्राम्हणवाडे, मुसळगाव, देशवंडी, जायगाव, पांगरी बुद्रुक, वावी, सायाळे, पाटपिंप्री, बारागावप्रिंप्री, भोकणी, सुंदरपूर या गावांमध्ये भूसंपादन केले जाईल. याशिवाय नाशिक तालुक्यातील जाखोरी, देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, चेहेडी बुद्रुक, संसरी, मोहगाव, बाभळेश्वर, पंचक आणि चाडेगाव या गावांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे.
