शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणींना नाशिककरांकडून उजाळा

तलवारीची मूठ आणि वरील भाग यावरून ती वापरणाऱ्याचा हुद्दा कळतो.

नाशिक येथील एका कार्यक्रमाप्रसंगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासमवेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी आमदार नितीन भोसले

‘जाणता राजा’ प्रयोगापासून ते नाशिकच्या शस्त्र संग्रहालयापर्यंत

नाशिक : तलवारीची मूठ आणि वरील भाग यावरून ती वापरणाऱ्याचा हुद्दा कळतो. तलवारीचे अनेक प्रकार असतात. काही मानाच्या तलवारी असतात. युद्धात वापरली जाणारी तलवार वेगळी असते. त्यात घोडेस्वाराकडील तलवार आणखी भिन्न असते..

महापालिकेत मनसे सत्तेत असतांना सहा वर्षांपूर्वी शहरात बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाची उभारणी इतिहास संशोधक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन आणि देखरेखीत झाली. त्यावेळी शिवशाहिरांनी तलवारींविषयी दिलेली माहिती ऐकून उपस्थित स्तब्ध झाले होते. या संग्रहालयासाठी त्यांनी आपल्याकडील शस्त्र उपलब्ध केली. यावेळी ऐतिहासिक तलवारी, शस्त्रास्त्रांविषयीचा त्यांचा अभ्यास, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम, गड-किल्ल्यांविषयीची आत्मियता आदींची अनुभूती मिळाल्याची आठवण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांना श्रध्दांजली अर्पण करताना नाशिकशी त्यांच्या असणाऱ्या जिव्हाळय़ाच्या संबंधांना अनेकांनी उजाळा दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून गंगापूर रस्त्यावरील पंिपग स्टेशन परिसरात शस्त्र संग्रहालयाची उभारणी झाली. त्यासाठी २७ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत बाबासाहेब हे चार दिवस नाशिकला मुक्कामी होते. विविध प्रकारच्या शेकडो तलवारी, ढाल, भाले, धनुष्यबाण असा ऐतिहासिक शस्त्रसंग्रह घेऊन ते आले होते. त्यातून १०० ते १५० शस्त्रास्त्रांची त्यांनी निवड केली. कुठले शस्त्र कुठे, कसे लावायचे इतक्या बारकाईने बाबासाहेब यांनी या कामात लक्ष घातले. चारही दिवस थांबून संग्रहालयाची आखणी केली. प्रत्येक तलवारीवर त्यांचा अभ्यास होता. त्यांचे विविध प्रकार दाखवून वैशिष्ठय़े नमूद केली. छत्रपती शिवाजी महाराज, गडकिल्ले यांच्याविषयी ते भरभरून बोलायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या आठवणी त्यांनी कथन केल्याचे मनसेचे प्रवक्ते आणि सचिव पराग िशत्रे यांनी सांगितले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे नाशिकमध्ये चार वेळा प्रयोग झाले. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांच्या पुढाकारातून २००८ मध्ये सात दिवस आयोजित महानाटय़ाचा तब्बल दीड लाख नाशिककरांनी आनंद घेतला होता. भोसले यांनी अतिविशेष व्यक्तींसाठी राखीव आसन अंध, अपंग, मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी दररोज उपलब्ध करून दिली होती. ते पाहून बाबासाहेब खुश झाले होते. आज खऱ्या अर्थाने आमचे महानाटय़ समाजातील उपेक्षित घटकापर्यंत नेल्याचे प्रशस्तीपत्रक त्यांनी दिल्याची आठवण भोसले यांनी कथन केली.

वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून मास्टर दिनानाथ स्मृती सोहळा २४ एप्रिल १९९९ रोजी झाला होता. यावेळी लता मंगेशकर यांच्या हस्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना साहित्य सेवेबद्दल ‘वाङ्मय विलासिनी’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २५ एप्रिल रोजी लतादीदींच्या हस्ते व्याख्यानमालेच्या ७८ व्या वर्षांचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यावेळी देखील बाबासाहेब उपस्थित होते, असे वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी सांगितले. प्रसिध्द साहित्यिक आणि चित्रपट परीक्षक दिवंगत मनोहर पुरंदरे हे नाशिकच्या सार्वजनिक वाचालयात कार्यरत होते. ते बाबासाहेबांचे लहान बंधू होत. अशा प्रकारे बाबासाहेबांचा नाशिकशी जिव्हाळय़ाचा संबंध होता, असा दाखला बेणी यांनी दिला.

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा इतिहास, मराठा साम्राज्य आणि शिवकालीन दस्तऐवजांचा सखोल अभ्यास बाबासाहेब पुरंदरे यांनी केल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. आयुष्यभर त्यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात व्याख्याने दिली. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ इतिहासकार महाराष्ट्राने गमावल्याची भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nashik shivshahir babasaheb purandare ysh

ताज्या बातम्या