नाशिक – नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे ठक्कर डोम येथे आयोजित तीन दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यासाठी एकाच वेळी सुरू असणाऱ्या विविध कामांमुळे नागरिकांमध्ये संताप आहे. ही बाब लक्षात घेऊन फडणवीस यांनी त्यावर भाष्य केले. कोणत्याही परिवर्तनावेळी असंतोषाला (शिव्यांना) सामोरे जावे लागते. कामे पूर्ण झाल्यानंतर ही मंडळी फुलांचे हार घालून आपली प्रशंसा करतील, असे त्यांनी नमूद केले.

कुंभमेळ्यासाठी रस्ते, पायाभूत सुविधा तसेच भाविकांसाठी आवश्यक विविध नागरी सुविधा विकसित करण्यात येत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी लक्षात घेता विविध कामे वेगात सुरू आहेत. सर्व संबंधित यंत्रणा ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा अविष्कार असलेल्या कुंभमेळ्याची सर्व कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

‘चांगले काम करताना घाबरू नका’

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याची जाणीव शासन-प्रशासनाला असून कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिक निश्चितपणे या कामांचे स्वागत करतील. कुठलेही परिवर्तन करताना सुरूवातीला जनतेच्या असंतोषाला (शिव्यांना) सामोरे जावेच लागते. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे तसेच आमदार हे स्थानिक असल्याने त्यांना जास्त शिव्या खाव्या लागतात. ज्या दिवशी कामे पूर्ण होतील, तेव्हा ही सर्व मंडळी फुलांचे हार घालून आपली प्रशंसा करतील. त्यामुळे नाशिकचे महापौर व नगरसेवकांनी चांगले काम करताना घाबरू नये. चांगले काम करताना दोन शिव्या खाण्याची तयारी ठेवावी. आपण जे काम करतोय ते जनहिताचे व पारदर्शी असले पाहिजे. या दोन गोष्टी असल्या तर कुठलीही काळजी करण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.