नाशिक – कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे विरोधकांकडून आरोप होत असले तरी कामांमध्ये पारदर्शकता असून सर्व कामे सार्वजनिक मालकीची आहेत. ज्यांच्या मनात तसेच आचरणात भ्रष्टाचार आहे, त्यांना सर्व कामात भ्रष्टाचार दिसत आहे. अशा पध्दतीने ओरड करुन कुंभमेळ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून हे जाणूनबुजून केलेले कारस्थान आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला.
नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, ठक्कर डोम येथे आयोजित ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. उदघाटन सोहळ्यात तसेच पत्रकार परिषदेत त्यांनी कुंभमेळ्यातील पायाभूत सुविधा, खर्चावर उपस्थित केले जाणारे प्रश्न, एकाचवेळी हाती घेतलेल्या कामांमुळे नागरिकांमधून व्यक्त होणारा संताप, गोदावरी नदीचे शुध्दीकरण, साधूग्रामसाठी जागा अधिग्रहण अशा विविध मुद्यांवर भाष्य केले.
विरोधक सातत्याने भ्रष्टाचाराविषयी बोलत आहेत. सर्व कामे पारदर्शक पध्दतीने सुरू आहेत. अयोध्या राममंदिरात एक व्यक्ती चुकला. पण चोरीचा आकडा मोठ्या प्रमाणावर फुगविण्यात आला. सनातन धर्म, आस्था असलेल्या ठिकाणांविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, लोकांना सर्व माहिती आहे, आसे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, पणनमंत्री जयकुमार रावल, शिक्षणमंत्री दादा भुसे, महापौर हिमगौरी आहेर-आडके आदी उपस्थित होते.
खर्चावर प्रश्न करणाऱ्यांनाही फटकारले
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी ३४ हजार कोटी रुपयांपैकी ९० ते ९३ टक्के पैसे हे कायमस्वरुपी पायाभूत सुविधांवर खर्च होत आहेत. या व्यवस्था केवळ कुंभमेळ्यापुरत्या नसून पुढील ५० वर्षे या ठिकाणी असणार आहेत. यातून नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसराला एक आधुनिक स्वरूप मिळणार आहे, असे सांगत फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या खर्चावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना फटकारले. कुंभमेळ्याच्या खर्चावर अनेक लोक बालबुद्धीने इतका खर्च का करताय असे प्रश्न करतात. परंतु, या निमित्ताने कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण होत आहेत. तीर्थक्षेत्र म्हणून ज्या कमतरता होत्या. त्या दूर केल्या जात आहेत. त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर तयार झाल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटेल, इतक्या चांगल्या पद्धतीने नियोजन केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडणार
साधुग्रामसाठी अडीच हजार कोटी रुपये खर्च करून कायमस्वरुपी जागा अधिग्रहित केली जात आहे. इतर प्रकल्पांतील भूसंपादनाच्या प्रश्नांवर सकारात्मकपणे तोडगा काढला जाईल. सर्व आखाडे व साधू-महंतांच्या मदतीने कितीही विघ्न आली तरी आगामी कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पाडला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
