नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाचा ध्वजारोहण सोहळा अतिशय दिमाखात आणि भव्यदिव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी तब्बल २० कोटींहून अधिक खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. नाशिक येथील रामकुंड, त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ आणि परिसरातील मंदिरे आकर्षक विद्युत रोषणाईने उजळण्यात आली होती. विद्युतीकरणावर पावणेतीन कोटी, तर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या जलद प्रवासासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये अडीच कोटी रुपये खर्चून तीन हेलिपॅड उभारण्यात आली. मात्र, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी रस्ते मार्गाने प्रवास केला.

शनिवारी कुंभमेळ्याचे ध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांच्यासह अनेक मंत्री आणि १३ आखाड्यांचे प्रमुख महंत यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडले. या निमित्ताने सामूहिक शंखनाद आणि गोदा महाआरती असे दोन विश्वविक्रम करण्यात आले. ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकनगरी सजवण्यात आली होती. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ज्या मार्गाने जाणार होत्या, त्या रस्त्यांची कामे रातोरात करण्यात आली.

ध्वजारोहण सोहळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ येथे व्यासपीठ, बॅरिकेडिंग, तंबू उभारणी व तत्सम कामांसाठी ११.१३ कोटी रुपये, नाशिक येथील रामकुंड येथे ध्वजारोहण सोहळा, गोदा महाआरती व शंखनाद या कार्यक्रमांसाठी तात्पुरते विद्युतीकरण (दोन कोटी पाच लाख रुपये), तसेच त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ आणि नवीन खाट येथे तात्पुरते विद्युतीकरण (७४ लाख ५० हजार रुपये) अशा खर्चाच्या प्रस्तावांना तातडीची बाब म्हणून नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. हे प्रस्ताव बैठकीत आयत्यावेळी मांडण्यात आले होते. त्यांची छाननी करता आली नाही. त्यामुळे तांत्रिक व प्रशासकीय बाबींची जबाबदारी संबंधित विभागावर सोपवण्यात आली, असे बैठकीच्या इतिवृत्तावरून स्पष्ट झाले आहे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी २० कोटींच्या आसपास खर्च झाल्याचा अंदाज प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हेलिपॅड उभारणी आणि रस्ते मार्गाने प्रवास…

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुरक्षित व जलद दौऱ्यासाठी तसेच आपत्कालीन हवाई वाहतुकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्र्यंबकेश्वर येथे २.४७ कोटी रुपये खर्चून हेलिपॅड उभारली. महत्त्वाची बाब म्हणजे, यासाठी निवडलेली जागा खासगी मालकीची होती. जमीनमालकी तपासून आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या हेलिकॉप्टरने नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जातील, असा प्रशासनाचा विचार होता. मात्र, ऐनवेळी त्यात बदल झाला. राष्ट्रपती मुर्मू यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाशिक-त्र्यंबकेश्वर प्रवास रस्ते मार्गाने केला.

खर्च वाढण्याची शक्यता

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्यासह अन्य विभागांनी रस्ते आणि इतर बाबींवर केलेला खर्च वेगळा आहे. ओझर ते नाशिकदरम्यानचा रस्ता एनएचएआयच्या अखत्यारीत आहे. त्याच्या दुरुस्तीवर कोणताही वेगळा खर्च करावा लागला नाही. अशा प्रसंगी रस्ते दुरुस्तीचा समावेश करारातच असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेने अतिमहत्त्वाच्या व्यक्ती जाणार असलेल्या रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती केली. चौकही सजवण्यात आले होते. इतर विभागांनीही विविध बाबींवर खर्च केला. त्यामुळे ध्वजारोहण सोहळ्याचा एकूण खर्च २० कोटींहून अधिक होण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.