नाशिक – घड्याळाचा काटा शनिवारी दुपारी १२ वाजून दोन मिनिटांवर जाताच नाशिक येथील रामकुंडावर राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आणि टाळ्यांचा कडकडाट, जय श्रीरामच्या जयघोषात सिंहस्थ कुंभपर्वास प्रारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, १३ आखाड्यांचे महंत, राज्यपाल जिष्णू देव वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभपर्वास नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी शनिवारी दुपारी १२ वाजून दोन मिनिटांनी ध्वजारोहणाने सुरुवात झाली. नाशिक येथील रामकुंड परिसरात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कुंभमेळ्याचे ध्वजारोहण महिलेच्या हस्ते होण्याची ही पहिलीच वेळ. ध्वजारोहणाआधी राष्ट्रपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत काही धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले.धर्मध्वजाचे पूजन, गंगापूजन तसेच ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले.
रामकुंड परिसरात मुख्य धर्मध्वजासह गंगा-गोदावरी मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले. रामकुंड येथे उभारण्यात येणारा मुख्य धर्मध्वज स्तंभ हा ५१ फूट उंच आणि पंचधातूंचा वापर करुन तयार करण्यात आलेला आहे. या स्तंभावर समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या १४ रत्नांचे प्रतिक साकारण्यात आले आहे. अमृत कलश धरलेला गरुडही स्तंभावर कोरण्यात आला आहे. दुसरा धर्मध्वज स्तंभ श्री गंगा गोदावरी माता मंदिराजवळ उभारण्यात आला आहे. या स्तंभाची उंची ३१ फूट असून हा स्तंभही पंचधातूचा आहे. या स्तंभावरही समुद्रमंथनातून आलेल्या १४ रत्नांचे चिन्ह आहे. त्यात हलाहल विष (कालकूट), कामधेनु (सुरभि गाय), उच्चैःश्रवा घोडा, ऐरावत हत्ती, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष पारिजात, रंभा (अप्सरा), महालक्ष्मी, वारुणी (सुरा/मद्य), चंद्रदेव (चंद्र), धन्वंतरी वैद्य, धनुष्य (हरिधनु), पांचाजन्य शंख, अमृत (अमृतकुंभ) यांचा समावेश आहे.
मुख्य धर्मध्वज हा साडेपंधरा फूट लांब आणि साडेपाच फूट उंचीचा आहे. ध्वजाच्या एका बाजूला बृहस्पतीचे वाहन सिंह, काळाचे प्रतिक म्हणून चंद्र-सूर्य दाखविण्यात आले आहेत. जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत, तोपर्यंत कुंभमेळा हा होतच राहणार, असा त्याचा अर्थ सांगितला जातो. मुख्य धर्मध्वजावरील सिंह हा शूरत्वाचे प्रतीक आहे. धर्मध्वजाच्या दुसऱ्या बाजूला अमृतकलश दाखविण्यात आला आहे. तो गोदामातेचे अमरत्वाचे व मुक्तीचे प्रतीक आहे. तसेच श्री आणि ओम हे हिंदू धर्माचे शुभचिन्ह म्हणून दाखवले आहे. मुख्य धर्मध्वजाला बारा रेशीम गोंडे, अंतर्नाद आणि ब्रम्हनादाचे प्रतिक म्हणून १५ घंटा आणि तीन घुंगरू आहेत. ध्वजाच्या चारही बाजूंना सुवर्ण रंगाची जरीची लेस लावण्यात आली आहे.
श्री गंगा गोदावरी पुरोहित संघाचा धर्मध्वज नऊ फूट लांब आणि पाच फूट उंचीचा आहे. या धर्मध्वजाच्या एका बाजूत गोदामातेचे अमरत्वाचे व मुक्तीचे प्रतीक म्हणून अमृतकलश, श्री आणि ओम हे हिंदू धर्माचे शुभचिन्ह दाखविण्यात आले आहे. ध्वजाला नऊ घंटा, सहा रेशमी गोंडे आणि तीन घुंगरु आहेत. गोंडे हे सामाजिक एकतेचे, संघ शक्तीचे प्रतीक आहेत. या धर्मध्वजाच्या दुसऱ्या बाजूला गोदावरी नदीचे वाहन मगर, सूर्य-चंद्र आहेत.
ध्वजारोहण कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, १३ आखाड्यांचे महंत, संत, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन , महापौर हिमगौरी आडके अहिरे, पुरोहित संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. ध्वजारोहण सोहळ्याचे साक्षी होण्यासाठी हजारो नाशिककर गोदाकाठी उपस्थित होते. नाशिक नगरी भगवेमय झाली. मंदिरे. गोदाकाठ परिसरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रामकुंड येथील मुख्य धर्मध्वज स्तंभ हा ५१ फूट उंच आणि पंचधातूंचा वापर करून तयार केलेला आहे. नाशिकच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर राष्ट्रपती या रस्ते मार्गाने त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर तसेच कुशावर्त येथे ध्वजस्तंभाचे दर्शन आणि पूजन करणार आहेत. .सायंकाळी नाशिकमधील रामकुंड परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६५०० आदिवासी बांधवांच्या सहभागातून महा गोदाआरती होणार आहे. या उपक्रमातून विश्वविक्रम नोंदविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
